भिवंडीत काँग्रेस नेते मनोज म्हात्रेची हत्या

0

भिवंडी । भिवंडी महानगरपालिकेतील नगरसेवक व काँग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे (५३) यांच्यावर मंगळवारी रात्री गावठी बंदुकीतून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने व चॉपरने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना ओसवाल वाडीमागे, कामतघर येथे घडली. या हत्येप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ प्रशांत म्हात्रेसहीत ७ जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.

भिवंडी महानगरपालिकेत गेल्या २५ वर्षांपासून नगरसेवक असलेले मनोज म्हात्रे हे सध्या महानगरपालिकेत सभागृह नेता म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्री ९ वाजून ४३ मिनिटांनी अंजूर फाटा येथे ओसवाल वाडी येथील इमारतीखाली आरटीका गाडीतून उतरून ते घराकडे जात होते. त्यावेळी इमारतीजवळील परिसरात दबा धरून बसलेल्या सात ते आठ अनोळखी हल्लेखोरानी त्यांच्यावर गावठी बंदुकीतून पाठीवर गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोरानी कोयत्याने व चॉपरने सपासप वर करून तेथून पळ काढला. त्यानंतर जखमी अवस्थेत म्हात्रे यांना नागरिकांनी तातडीने पुढील उपचारासाठी ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले.