भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला तारणार भारताचाच ‘श्रीराम’!

0

– माजी भारतीय फिरकीपटू श्रीराम श्रीधरनची फिरकी सल्लागारपदी नियुक्ती
– 29 जानेवारीपासून दुबईमध्ये सराव; पुढील चार कसोटी सामन्यांपर्यंत श्रीराम संघाबरोबर

मेलबोर्न : क्रिकेट आॅस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. भारत दौऱ्याची तयारी करण्यासाठी इंग्लंडचा फिरकीपटू माँटी पनेसरची फिरकी गोलंदाज सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय दौऱ्यामध्ये फिरकी गोलंदाजीचे अस्त्र धारदार व्हावे, यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने एका भारतीयाचीच मदत घेतली आहे. श्रीधरन श्रीराम हे माजी गोलंदाज भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय, ऑस्ट्रेलियामध्ये या गोलंदाजांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी इंग्लंडचा फिरकी गोलंदाज माँटी पानेसर याच्यावर सोपविण्यात आली आहे.

म्हणून श्रीधरनची मदत
फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा सुरू होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने चार फिरकी गोलंदाजांना निवडले आहे. चार वर्षांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला 0-4 असा ‘व्हाईटवॉश’ मिळाला होता. काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेमध्येही ऑस्ट्रेलियाला 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. कसोटी मालिकेत फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळण्यास सक्षम बनविण्यासाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने माजी भारतीय फिरकीपटू श्रीराम श्रीधरनची फिरकी सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. श्रीधरनने भारतातर्फे मार्च २००० ते डिसेंबर २००४ या कालावधीत ८ वन-डे सामने खेळले आहेत.

दुबईत करणार सराव
ऑस्ट्रेलियाचा संघ 29 जानेवारीपासून दुबईमध्ये सराव करणार आहे. या सरावापासून पुढील चार कसोटी सामन्यांपर्यंत श्रीराम संघाबरोबर असतील. ऑस्ट्रेलियाच्या संघात नॅथन लिओन, स्टीव्ह ओकफी, ऍश्‍टन ऍगर, मिशेल स्वेप्सन या चार फिरकी गोलंदाजांसह ग्लेन मॅक्‍सवेल हा अष्टपैलू खेळाडूही आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्यासाठी श्रीराम सल्लागार म्हणून काम करतील. यापूर्वीही श्रीराम यांनी ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंका दौऱ्यात आणि भारतात झालेल्या ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेदरम्यान फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन केले होते. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्ह ओकफी या डावखुऱ्या गोलंदाजाला संधी मिळाली आहे. ओकफीला मार्गदर्शन करण्यासाठी माँटी पानेसरची निवड करण्यात आली आहे.

अनुभवामुळे पानेसरची नियुक्ती
सिडनीमध्ये क्लब क्रिकेटपटू म्हणून खेळत असलेल्या ३४ वर्षीय पानेसरने २०१२-१३ मध्ये इंग्लंडला भारतात संस्मरणीय विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे क्रिकेट आॅस्ट्रेलियाने त्याची निवड केली आहे. पानेसरने त्यावेळी तीन कसोटी सामन्यांत १७ बळी घेतले होते.पानेसर या आठवड्यात सेंटर आॅफ एक्सलन्सचा दौरा करणार असून तो फिरकीपटू स्टीव्ह ओ किफे व्यतिरिक्त सलामीवीर मॅट रेनशॉ यांच्यासोबत काम करणार आहे. पानेसरची नियुक्ती क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे हाय परफारमन्स व्यवस्थापक पॅट होवार्ड यांच्या मतानुसार करण्यात आली.
ऑस्ट्रेलिया खेळणार चार कसोटी

पहिली कसोटी : 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी : पुणे
दुसरी कसोटी : 4 मार्च ते 8 मार्च : बंगळूर
तिसरी कसोटी : 16 मार्च ते 20 मार्च : रांची
चौथी कसोटी : 25 मार्च ते 29 मार्च : धरमशाला