भारत आक्रमक : चीनचे सैन्य २ किमी मागे हटले

0

नवी दिल्ली – चीनच्या दादागिरीमुळे गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे. पूर्व लडाखच्या काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. चीनने इथे मोठया प्रमाणात सैन्याची तैनाती सुद्धा केली आहे. या विरोधात भारतानेही आक्रमक भुमिका घेत चीनला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्याने आता चीनचे सैनिक सीमेपासून दोन किलोमीटर मागे हटले आहेत. तर भारतीय लष्कराचे जवान आपल्या जागेपासून एक किलोमीटर मागे हटले आहेत.

पूर्व लडाखमध्ये मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच हा वाद सुरू आहे. लडाखने एलएसीवर भारताच्यावतीने रस्ता बांधकाम करण्याचे काम करत होते. त्याला चीनने विरोध केला. यानंतर ५ मे रोजी पँगोंग तलावावर दोन्ही देशांचे सैनिक आपापसात भिडले. या चकमकीत काही सैनिकही जखमी झाले. यानंतर चीनने या भागात आपल्या सैनिकांची तुकडी वाढविली. तसेच, चीनने सैन्य तैनात करण्याबरोबरच त्यांनी तंबूही बांधले. भारतीय लष्कराच्या जवानांनी एलएसीवरील चीनच्या या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानही एलएसी सीमेवर तैनात राहिले. यामुळे तणाव वाढत आहे. लडाखच्या सीमावर्ती भागात चिनी सैन्य आपले सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय लष्कराचे जवान देखील त्याच्यासमोर उभे राहिले आहे. दोन्ही बाजूंकडून वाटाघाटीही सुरू आहेत, परंतु अद्याप हा वाद संपलेला नाही. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या लष्करांची चर्चा होणार आहे. ६ जून रोजी ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या सैन्याचे लेफ्टनंट जर्नल रँकचे अधिकारी भाग घेतील. भारताकडून १४ कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह चिनी लेफ्टनंट जनरल बरोबर चर्चा करणार आहेत. भारतीय लष्करातील सूत्रांनी ही माहिती दिली. पँगाँग टीएसओ तलावाचा भाग या चर्चेमध्ये मुख्य मुद्दा असेल. तलावाजवळच्या फिंगर फोर एरियामध्ये चिनी सैन्याने तळ ठोकला आहे.

Copy