भारतीय जनता पार्टीत ‘इनकमिंग’चे सत्र सुरु

0

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार मंगेश सांगळे व काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केला. शिवसेनेच्या नगरसेविका लीना शुक्ला, मनसेचे नगसेवक भालचंद्र आंबोरे, काँग्रेसचे नगरसेवक परविंदरसिंग भामरा, शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश नाईक आणि ख्यातनाम अभिनेते दिलीप ताहील यांनीही यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश
केला.

हेगडे, सांगडे यांचा प्रवेश
दोन माजी आमदार, तीन विद्यमान नगरसेवक एक माजी नगरसेवक आणि अभिनेते दिलीप ताहील, लखनपाल, सोशल मिडियामध्ये काम करणारे प्रवीण शेट्टी, एनआरआय गौतम गुप्ता यांनीही पक्षप्रवेश केला. मंगेश सांगळे हे विक्रोळी कन्नमवार परिसरातून सुरूवातीला नगरसेवक त्यानंतर आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे दिवंगत शिवसेना नेते डॉ. रमेश प्रभू यांचे जावई असून विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. डॉ. प्रभू व त्यांचे कुटूंबीय आणि कृष्णा हेगडे यांचे कुटूंबीय हिंदुत्वाशी जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांचे पक्षात स्वागत करताना अत्यंत आनंद होत आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या चांदिवली येथील विद्यमान नगरसेविका लीना शुक्ला, मनसेचे जोगेश्वरीतील नगरसेवक भालचंद्र आंबोरे आणि मालाड येथील काँग्रेस नगरसेवक परविंदरसिंग भामरा यांनीही भाजपात प्रवेश केला. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि महापालिकेच्या आरोग्य समितीचे तत्कालीन अध्यक्ष रमेश नाईक यांनीही भाजपात प्रवेश केला.

हेगडेंची काँग्रेसवर टीका
यावेळी बोलताना कृष्णा हेगडे म्हणाले की, एकीकडे भाजपाने पारदर्शी कारभाराचा अजेंडा हाती घेतला असताना काँग्रेसमध्ये म्हाडामधील भ्रष्ट कंत्राटदारांना तिकीटे देण्याचे काम सुरू आहे. म्हणूनच मी या कारभाराला कंटाळून पारदर्शी कारभाराचा अजेंडा हाती घेणार्‍या भाजपात प्रवेश केला आहे. मंगेश सांगळे म्हणाले की, मला राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा करायची आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे करत असलेल्या कामाने मी प्रभावीत झालो आणि त्यांच्या देशहिताच्या कामात मलाही खारीचा वाटा उचलता यावा म्हणून मी आज भाजपात प्रवेश करत आहे. आमदार प्रवीण दरेकर, महापालिका गटनेते मनोज कोटक, भाजपा मुंबई उपाध्यक्ष भालचंद्र शिरसाट, नगरसेवक विनोद शेलार, प्रवक्ते अतुल शाह आदी उपस्थित होते.