भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजावणार

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे आता जागतिक पातळीवरही प्रतिसाद उमटू लागले आहे. रशियाने नोटाबंदीवरून भारताकडे निषेध नोंदवला आहे. भारतातील रशियन दूतावासात काम करणारे कर्मचारी आणि अधिकार्‍यांना नोटाबंदीचा फटका बसत असून तातडीने यावर तोडगा काढावा अन्यथा नाईलाजाने मॉस्कोमधील भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजवण्यात येईल, असा इशाराच रशियाने दिला आहे. रशियाचे उच्चायुक्त अलेक्झांडर कडाकीन यांनी भारतातील दूतावासात काम करणार्‍या रशियन कर्मचार्‍यांचा प्रश्‍न उपस्थित केला आहे. राजनैतिक अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयातील दैनंदिन कामकाजासाठी पुरेसे पैसे काढू शकत नाही. त्यामुळे आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेच या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे, आम्ही परराष्ट्र मंत्रालयाकडून उत्तराची वाट बघत आहोत. भारतात रशियाचे सुमारे 200 कर्मचारी कार्यरत आहेत.

अन्यथा आम्हाला अन्य पर्यायांचा वापर करावा लागेल आणि यात मॉस्कोमधील भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजावण्याचा विचारही केला जाईल, अशी माहिती रशियन दूतावासातील वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. आम्हाला बाहेरून जेवण मागवतानाही अडचणींचा सामना करावा लागतो अशी प्रतिक्रिया एका अधिकार्‍याने दिली. समन्स बजावण्यासोबतच अधिकार्‍यांच्या पैसे काढण्यावर निर्बंध आणू, असेही एका अधिकार्‍याने सांगितले. भारताने अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.