भारताविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय

0

ब्रिस्बेन : भारताविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ धावांनी विजय मिळवला. पावसाने व्यत्य आणल्यामुळे १७ षटकांच्या करण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ बाद १५८ धावा केल्या होत्या. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला १७ षटकात १७४ धावांचे आव्हान देण्यात आले. सलामीवीर शिखर धवनच्या (७६) आणि अनुभवी दिनेश कार्तिकच्या ३० धावांच्या खेळीनंतरही भारताला हा सामना जिंकता आला नाही. त्यामुळे या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात काहीशी संथ झाली. फलंदाज डार्सी शॉर्ट ७ धावांवर बाद झाला. पण कर्णधार फिंच आणि लीन यांनी दमदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. फिंचने २४ चेंडूत २७ तर लीनने २० चेंडूत ३७ धावा काढल्या. हे दोघे बाद झाल्यावर मॅक्सवेलने सामन्याचा ताबा घेत २३ चेंडूत ४६ धावा केल्या. स्टोयनीसने त्याला उत्तम साथ देत १९ चेंडूत ३३ धावा केल्या. भारताकडून कुलदीपने २ तर अहमद, बुमराने १-१ गडी बाद केला.

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला केवळ १६९ धावाच करता आल्या. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा ७ धावांवर बाद झाला. त्या पाठोपाठ राहुल १३ धावांवर परतला. लगेचच कोहलीही ४ धाव करून तंबूत परतला. पण शिखर धवनने एकाकी लढत देत ७६ धावा केल्या. पण तो झेलबाद झाला. कार्तिकने १३ चेंडूत ३० धावा केल्या. पण त्याची झुंज अपयशी ठरली.