भारतात १३ कोटी नोकर्‍यांवर येणार गदा

0

नवी दिल्ली – करोनामुळे देशात ३१ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. तर यामुळे देशाचे अर्थचक्रही थांबले आहे. यामुळे देशातील १३.५ कोटी लोकांच्या नोकरीवर गदा येऊ शकते १२ कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकतात अशी धक्कादायक बाब इंटरनॅशनल मॅनेजमेंट कंस्लटिंग फर्म ‘आर्थर डी लिटिल’च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

या अहवालामध्ये केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँकेने उचललेल्या पावलांचे कौतुक करण्यात आले आहे. परंतु अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात होणार्‍या नुकसानीला आळा घालण्यासाठी धोरणे अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत आर्थर डी लिटिलचे भारत आणि दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मॅनेजिंग पार्टनर बार्निक मित्रा यांनी म्हटले आहे. प्रतिव्यक्ती उत्पन्न कमी होणार असून जीडीपीमध्येही मोठी घरसण होणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. करोनाचे वाढते रुग्ण पाहून भारतात याची डब्लू शेप रिकव्हरी होईल. त्यामुळे २०२०-२१ मध्ये जीडीपीमध्ये १०.८ टक्क्यांची घट होईल. तसंच २०२१-२२ या कालावधीत जीडीपी वाढीचा दर ०.८ टक्के असेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त भारतात बेरोजगारीचा दर ७.६ टक्क्यांनी वाढून ३५ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. तसंच यामुळे १३.६ कोटी लोकांच्या रोजगारावर गदा येईल आणि देशात बरोजगारांची संख्या १७.४ कोटीवर जाईल, असंही त्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त १२ कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या कक्षेत येतील आणि ४ कोटी अत्यंत गरीब होतील असेही अहवालात सांगण्यात आले आहे.

Copy