भारताची संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर निवड

0

नवी दिल्ली : भारताची संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर शुक्रवारी तीन वर्षांसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, परिषदेच्या सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या देशांमध्ये भारताने सर्वांधिक 188 मते मिळवली.

भारताने आशिया-पॅसिफिक विभागातून ही निवडणूक लढवली. या वर्गातून निवडून दिल्या जाण्याच्या पाच सदस्यपदांसाठी भारतासह बहारीन, बांगलादेश, फिजी आणि फिलिपाईन्स या पाच देशांकडून दावा करण्यात आला. त्यामुळे भारताचा विजय निश्‍चित होता. परिषदेवर निवडून जाण्यासाठी किमान 97 मतांची आवश्यकता होती. त्यापेक्षा जवळपास दुप्पट मते भारताला मिळाली. परिषदेचे सदस्य म्हणून भारतासह 18 देशांची पाच विभागांतून निवड झाली.

दरम्यान, भारताला निवडणुकीत मिळालेल्या मतांमधून आंतरराष्ट्रीय समुदायाचा असणारा पाठिंबा प्रतिबिंबित झाल्याची प्रतिक्रिया भारताचे संयुक्त राष्ट्रांमधील स्थायी प्रतिनिधी सैद अकबरूद्दीन यांनी दिली. भारतासह परिषदेच्या नव्या सदस्यांची मुदत 1 जानेवारी 2019 पासून सुरू होईल. याआधी 2011 ते 2017 अशा सलग दोन कार्यकाळांसाठी भारताची जीनिव्हास्थित परिषदेवर निवड झाली होती.

Copy