भारताचा नकोसा विक्रम

0

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यापासून देशातील कोरोनाबाधितांचा आकडा अतिशय झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 24 हजार 850 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासांमधील ही सर्वात मोठी वाढ आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 73 हजार 165 वर पोहोचली आहे. रशियातील रुग्णसंख्या 6 लाख 74 हजार 515 इतकी आहे. भारतातील कोरोना रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता भारत रशियाला मागे टाकण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. िकिकिंबहून हे वाचत असतांना भारताने रिशियला मागे टाकलेले असेल कारण भारत आणि रशियाची तुलना केल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत जेमतेम दीड हजाराचं अंतर आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानावर जाईल. या यादीत अमेरिका (29 लाखांहून अधिक रुग्ण) पहिल्या, तर ब्राझील (15.5 लाख रुग्ण) दुसर्‍या स्थानी आहे.

देशात सध्याच्या घडीला 2 लाख 44 हजार 814 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 19 हजार 268 हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाचा धोका वाढत असल्याचे अधोरेखित झाले आहे. कोरोनामुळे केवळ भारतियांच्या आरोग्यावर परिणाम होतोय असे नाही तर कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेक समस्यांचा जन्म झाला आहे. भारताची आर्थिक घडी विस्कटली आहे. अनेकांच्या हाताचा रोजगार गेल्याने काहींनी आत्महत्येचा मार्ग देखील निवडला आहे. एकीकडे आपण महासत्त्ता होण्याची स्वप्न पाहत असतांना केवळ दोनवेळेचे जेवण मिळत नाही म्हणून आत्महत्या होत असतील तर आपण नेमकं कुणाला फसवतोयं याचा प्रामाणिकपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. कारोनाच्या तडाख्यातून लोकांना जीव वाचवणे यास जसे प्राधान्य दिले जात आहे, तेवढेच लॉकडाऊनचा ज्या समाजघटकांवर आनुषंगिक परिणाम होत आहेत, त्यांच्या पुनर्वसनाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

सुररुवातीला पंतपप्रधान नरेेंदद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केले तेेंव्हा याला 100 दिवसापेक्षा जास्त वेळ लागू शकेल, याचा कुणी विचार केला नसेल. पहिल्या टप्प्यात स्थलांतरित मजुरांच्या हालअपेष्टा संपूर्ण जगाने पाहिल्या आहेत. आता हातावर पोट असलेले रिक्षा- टॅक्सीचालक, नाक्यानाक्यांवरचे पानवाले, चहावाले, छोटे दुकानदार, छोटे व्यावसायिक आणि मोलमजुरीची कामे करणार्‍यांनी हा काळ कसा रेटला असेल, ते त्यांचे तेच जाणोत. हा काळ सर्वांना कठीण गेला परिणामी आर्थिक असुरक्षिततेची भावना निर्माण होवू लागली आहे. आर्थिकदृष्ट्या विवंचनेत असलेल्यांना बळ देण्याची आवश्यकता आहे.

जगभरात कोरोनाच्या साथीची दुसरी लाट येण्याचा धोका ‘जागतिक आरोग्य संघटने’ने व्यक्त केला आहे. भारतातील रुग्णसंख्या वाढत असली, तरी अजूनही कोरोनाच्या संसर्गाचा प्रस्फोट झालेला नाही, असे ‘जागतिक आरोग्य संघटने’चे म्हणणे आहे. कोरोनाचा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असेल, तर त्यास सामोरे जाण्याचे दोन पर्याय आहेत. इतक्या सगळ्यांच्या उपचारांची व्यवस्था करीत राहणे अथवा समूहप्रतिकारशक्ती तयार होईल, याची वाट पाहणे. सध्या लस काही उपलब्ध नाही, त्यामुळे या संकटाला सामोरे जाणे एवढेच आपल्या हातात आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांसाठी औषधे उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. या विषाणूवर वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी व लसींवर संशोधन सुरू आहे. जगभरात कोरोनावर 135 हून अधिक लसींवर संशोधक काम करीत आहेत. होल व्हायरस व्हॅक्सिन, जेनेटिक व्हॅक्सिन, व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिन, प्रोटिन बेस्ड व्हॅक्सिन असे त्याचे प्रकार आहेत.

नव्या संशोधनानुसार, फॅबिफ्लू हे औषध कोरोनाच्या रुग्णांना नवसंजीवनी ठरेल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे. सध्या भारतामध्ये कोरोनावरील उपचारांत ‘रेमडिसिविर’ आणि ‘टोसिलिझुमाब’ या औषधांचा वापर केला जातो. ही तिन्ही औषधे ‘अँटिव्हायरल’ आहेत. यासह डेक्सामिथेसोन, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, ‘ओवायए 1’ अशी इतर औषधेही जगभरात वापरली जात आहेत. परंतु, या सर्व औषधांची उपयुक्तता पूर्णपणे सिद्ध झालेली नाही, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. यामुळे भारतात वाढणारी रुग्णसंख्या ही चिंतेचे कारण आहे. यावर सरकारी व प्रशासकीय यंत्रणा कशी काम करत आहे? यावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्येकाने जबाबदारी उचलण्याची वेळ आली आहे. कारण भारत आता जगात तिसर्‍या क्रमांकावर येईल, हा नकोसा विक्रम अनेक समस्यांना जन्म देणार आहे. 133 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारताला असा नकोसा विक्रम किती महागात पडू शकतो, याची कल्पना न केलेलीच बरी! जगातील सर्वात मोठी महसत्त्ता असे बिरुद मिरवणारी अमेरिका कोरोनापुढे हतबल झाली आहे मग भारताचा काय टिकाव लागेल, याची जाणीव आता बर्‍यापैकी झाली आहे. यासाठी विषाची परीक्षा न घेता प्रत्येकानेच कोरोना योध्दा प्रमाणे जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे.

दोन महिन्यांपासून अमेरिकेची परिस्थितीत इतकी बिकट आहे की रुग्णालयात रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. परिणामी कोरोनाच्या रुग्णांवर घरीच उपचार करण्याची वेळ महासत्ता असलेल्या अमेरिकेसारख्या राष्ट्रावर ओढावली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि दिल्ली या शहरात अमेरिकेतील शहराप्रमाणे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळताना दिसत आहेत. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना यातून बरे होणार्‍या रुग्णांचा आकडा हा समाधानकारकरित्या वाढणे ही दिलासादायक घटना आहे. इतर देशाच्या तुलनेत मुंबई आणि दिल्लीतील रुग्णांचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे. ही तेवढीच एक जमेची बाजू!

Copy