भादली बुद्रूक येथे विवाहितेची आत्महत्या

0

जळगाव । भादली बुद्रूक येथे एका 26 वर्षीय विवाहितेने मंगळवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास साडीच्या सहाय्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. विवाहितेच्या मृतदेहास जिल्हा रुग्णालयात शवविच्छेनासाठी दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी त्या ठिकाणी एकच गर्दी करत आक्रोश केला. कविता सतिष कोळी असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सतिष जनार्दन कोळी हे भादली बुद्रूक येथे कुटूंबियांसोबत राहतात. तर तहसिल कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. आज मंगळवारी सकाळी 7 वाजता सतिष कोळी यांना तहसिलदार अमोल निकम यांनी कामानिमित्त त्यांच्या बंगल्यावर बोलवून घेतले. त्यामुळे त्याच्या घरी फक्त पत्नी कविता व मुलगा गौरव, मुलगी कल्याणी घरी होते. परंतू दोन्ही मुलेही काही वेळानंतर शाळेत गेल्यामुळे कविता ह्या घरात एकट्याच होत्या. सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास कविता यांच्या घरासमोरच राहणार्‍या सासु अनुसयाबाई ह्या घराकडे आल्या असता त्यांनी कविता यांना आरोडी मारली परंतू घरातून कुणीही आवाज दिला नाही. यानंतर शेजारी राहणारे अनिल कोळी यांनीही दार ठोठावला. घरातून प्रतिसाद मिळत नसल्याने कोळी यांनी खिडकी उघडली. यावेळी त्यांना कविता ह्या साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. परिसरातील रहिवाश्यांनी घराचा दरवाजा तोडून कविता यांना खाली उतरवून रिक्षात बसवून जिल्हा रूग्णालयात नेले. जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी कविता यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच माहेरच्या मंडळींनी जिल्हा रूग्णालयात गाठत एकच आक्रोश केला. दुपारी सतिष कोळी हे देखील रूग्णालयात आले होते. परंतू माहेरच्या मंडळींनी आरोप केल्यानंतर त्यांना पोलिस चौकीतच पोलिसांनी बसवून ठेवले होते.

मुंबई पोलिसांनी दिपक गुप्ता यांना घेतले ताब्यात
जळगाव मुंबईतील महिला आमदारांना मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठविल्या प्रकरणी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार प्यारेलाल गुप्ता (रा.शिवाजी नगर, जळगाव) यांना मंगळवारी मुंबई पोलिसांनी जळगावात येवून ताब्यात घेतले. याबाबत विलेपार्ले मुंबई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. मुंबई येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथील महिला आमदारांना 21 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजता मोबाईलवर एक अश्लिल मेसेज आला होता. त्याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विलेपार्ले पोलीस स्टेशनला गु.र.नं 64/2017 भादवि कलम 507,509, आय.टी.अ‍ॅक्ट 66(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात आमदारांना आलेला मेसेज हा दीपक गुप्ता यांच्या मोबाईल क्रमांकावरुन आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी उपनिरीक्षक विकास पाटील, कॉन्स्टेबल पी.एन.शिंदे व अडकमोल यांचे पथक मंगळवारी सकाळीच जळगाव शहरात आले. या पथकाने जळगावात आल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला भेट देवून स्टेशन डायरीला रितसर नोंद केली व त्यानंतर गुप्ता यांना पोलीस घरुन पोलीस स्टेशनला आणण्यात आले. यावेळी उपनिरीक्षक पाटील यांनी गुप्ता यांच्या पत्नी ज्योती गुप्ता यांना गुन्ह्याची माहिती देवून तशी नोटीस दिली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गुप्ता यांना रेल्वेने मुंबईला नेण्यात आले.

नशिराबादजवळ रिक्षा पलटी
जळगाव। नशिराबाद जवळील बेढीगावाजवळ रिक्षा उलटल्याने चार मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. यावेळी जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सायंकाळी बेढीगावाजवळून जात असलेली प्रवाशी रिक्षा अचानक उलटून कोरड्या नाल्यात पडली. यात राहूल रामदास खचाने वय-23 रा. रंजनाबाई भावलाल मोरे वय-40 दोन्ही रा. नशिराबाद तर रामदास सुकलाल मोरे वय-40, सुरेश काळू भिल वय-30 दोन्ही रा. पळासखेडा ता. जामनेर हे जखमी झाले आहेत.

यांना सायंकाळी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, चौघेही मजुर असून सायंकाळी काम आटोपून घरी जात असतांना घटना घडली.