भादलीतील तरुणाचा अल्पवशीन तरुणीशी असलेल्या प्रेमसंबंधातून खून : दोघे अल्पवयीन ताब्यात

Murder of young man in Bhadli Due to Love Affair : Two Juvenile Suspects Detained भुसावळ : नशिराबाद पोलिस ठाणे हद्दीतील भादली गावातील संकेत लिलाधर आढाळे (28, भादली) या तरुणाचा बुधवारी सकाळी कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ असलेल्या शेतात खून करून मृतदेह टाकण्यात आला होता. नशिराबाद पोलिसांनी या खूनाचा उलगडा केला असून दोन अल्पवयीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून दोघांनी चाकूचे तब्बल 31 वार करून संकेतचा खून केल्याची कबुली दिली आहे.

बोलण्याच्या निमित्ताने शेतात नेत काढला काटा
संकेत आढाळे हा तरुण मंगळवारी रात्री 10.15 वाजता घराबाहेर पडला होता मात्र गावातील दोन अल्पवयीन तरुणांपैकी एकाच्या बहिणीशी संकेतचे प्रेमसंबंध होते व संबंध तोडावेत, बोलणे बंद करावे म्हणून तरुणांनी संकेतला बजावले मात्र उलट अल्पवयीन तरुणीला पळवून नेण्याची संकेतने धमकी दिल्याने संशयीतांचा पारा अधिक चढला व मंगळवारी रात्री त्यांनी बोलायचे आहे म्हणून संकेतला गोड बोलून शेतात नेले. सोबत आणलेल्या चाकूने तब्बल 31 चाकूचे वार संकेतच्या पोटावर करून आरोपींनी पळ काढल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अत्यंत बारकाईने या खुनाबाबत माहिती गोळा केली. तरुणाला आलेले फोन, त्याच्या संपर्कातील लोक यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले तर घटनेच्या दिवशी तरुण कुणासोबत बाहेर पडला याची माहिती काढल्यानंतर दोन अल्पवयीन संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची बारकाईने चौकशी केल्यानंतर संशयीतांनी खुनाची कबुली दिली. बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून हा प्रकार घडल्याची कबुली संशयीतांनी दिली आहे.