भाजीपाला, दुध विक्रीसाठी वेळेची मर्यादा

1

सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेतच खरेदी विक्री : जिल्हाधिकार्‍यांचे नव्याने आदेश

जळगाव –कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर दैनंदीन आढावा घेतला जात आहे. भाजीपाला, दूध, औषधीच्या निमीत्ताने बाहेर पडणार्‍यांसाठी आता निर्बंध लावण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी दुध विक्री केंद्रे, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, रस्त्यावर हातगाडीद्वारे विक्री करणारे विक्रेते संस्थांद्वारे भरविण्यात येणारे बाजार यांचे व्यवहार आता उद्या दि. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेतच सुरू ठेवण्याचे नव्याने आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.
जिल्ह्यातील शहरी भागातील नागरिक अनावश्यकरीत्या रस्त्यावर फिरतांना गर्दी करतांना दिसून येत आहे. तसेच सोशल डिस्टंन्सींगचेही पालन होताना दिसत नाही. लॉकडाऊन असतांनाही नागरिक भाजीपाला, दुध, औषधाच्या निमीत्ताने रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा अधिक धोका आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी भाजीपाला, दुध, फळे विक्रीसाठी वेळेची मर्यादा घालून दिली आहे.


खरेदीसाठी सात तासाचा कालावधी
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश असले तरी आता ठरलेल्या वेळेतच भाजीपाला, दुध, व फळे खरेदी करता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ५ अशा सात तासाच्या आतच खरेदी-विक्री करता येणार आहे. या वेळे व्यतीरिक्त इतर वेळेला खरेदी-विक्री होतांना आढळुन आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून शिक्षा सुनावली जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


इंन्सीडेंट कमांडरची जबाबदारी
जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या नव्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी इन्सीडेंट कमांडरची राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहिता १८६०(४५) चे कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व संबंधित महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

औषध विक्रेत्यांनाही होम डिलीव्हरीच्या सुचना
जिल्ह्यातील औधणी दुकाने, फार्मसी, केमिस्ट, ड्रगिस्ट (घाऊक व किरकोळ) व्यावसायिकांसाठीही नव्याने आदेश देण्यात आले आहे. त्यात औषध विक्रेत्यांनी शक्यतो औषधांची होम डिलीव्हरी म्हणजेच घरपोच सेवेवर भर द्यावा. तसेच डॉक्टरांच्या शिफारसी शिवाय औषधाची विक्री करू नये. ग्राहकास औषध विक्री केल्यानंतर प्रिस्क्रीप्शनवर औषध दिल्याबाबतचा शिक्का मारावा. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास औषध निरीक्षकांना कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

Copy