भाजप युतीचे सरकार फक्त राजकारण करतेय!

0

मुंबई (प्रतिनिधी) – इंदु मिलच्या नावाने शिवसेना भाजप युतीचे सरकार फक्त राजकारण करत असून या जागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भुमिपुजन होऊन वर्ष उलटून गेले तरीही राज्य सरकारला ही जमिन ताब्यात घेता आली नाही,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. अहिर यांनी आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी दादरच्या चैत्यभुमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले,त्यावेळी ते बोलत होते. दादरच्या इंदु मिल परिसरात डॉ. आंबेडकरांचे भव्य दिव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी बाबासाहेबांच्या तमाम अनुयायांची इच्छा आहे. या स्मारकाकडे अवघ्या देशभरातील जनता डोळे लावून बसलेली असताना, केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या भावनांशी खेळत आहे. स्मारकाच्या मुद्द्याचा निव्वळ राजकारणासाठी वापर करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.