भाजप मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक लढवणार नाही

0

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्वांनाच धक्का दिला. एकीकडे त्यांचे सहकारी सत्तेसाठी जुळवाजुळव करत असताना तर दुसरीकडे शिवसेनेची सत्ता राखण्यासाठी वेगळी खेळी खेळण्याची तयारी सुरु असतानाच त्यांनी महापौर व अन्य निवडणुका न लढवण्याची घोषणा केली. महापालिकेत भाजपाचे नगरसेवक पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून बसतील असे स्पष्ट करत मुंबई महापालिकेत दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपाने मुंबईच्या महापौरपदासह, उपमहापौरपद स्थायी समिती किंवा अऩ्य कुठल्याही समित्याची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा निवासस्थानी पत्रकारपरिषदेत ही मोठी घोषणा केली आहे.

मुंबईच्या जनेतेने पारदर्शकतेला कौल दिला आहे. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण करुन महापौरपद मिळवणे ही फसवणूक ठरेल अशी स्पष्ट भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी महापालिकेत विकासाच्या मुद्यांवर शिवसेनेला भाजपा पाठिंबा देईल असे सांगितले. मात्र पारदर्शकता आणण्यासाठी आणि महापालीकातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी आवश्यक तिथे भाजपचे नगरसेवक परखड भूमिका ही घेतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुंबईसाठी स्वतंत्र उपलोकायुक्त नेमणार असल्याचे सांगत ते नेमण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्याप्रमाणे मुंबईसाठी स्वतंत्र उपलोकायुक्त नेमून त्यांच्याकडे मुंबईचे अधिकार दिले जातील आणि मुंबईसाठी संस्थात्मक व्यवस्था निर्माण केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याचसोबत महानगर पालिकेत पारदर्शकता यावी यासाठी राज्य सरकार वरिष्ठ सनदी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली. रामनाथ झा, शरद काले यांसारख्या वरिष्ठ सनदी अधिकारी पुढील ३ महिन्यांत पालिकेतील समित्यांचा आणि कारभाराची माहिती घेउन,अभ्यास करून शिफारशी करतील असेही त्यानी सांगितले.

मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपाला मोठ यश मिळाले. भाजपच्या जागा ३१ वरून ८२ पर्यंत वाढल्या यावरून मुंबईकरांनी पारदर्शकतेला कौल दिला असून राज्यातील नगरपालिका, जिल्हापरिषदा आणि महापालिका निवडणुकीत भाजपा राज्यातील नंबर १ पक्ष ठरल्याचे त्यांनी सांगितले. आठ महापालिकांमध्ये भाजपचा महापौर बसणार आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेला ८४ आणि भाजपला ८२ जागा जिंकता आल्या. खरेतर दोन्ही पक्षांनाही कौल सारखाच मिळाला आहे. पण शिवसेनेला दोन जागा अधिक मिळाल्या. भाजपच्या कोअर कमिटीने सध्याच्या परिस्थितीवर विचार केला. मुंबई महापौरपदासाठी दावा करणार आहोत की नाही, यावरही बैठकीत चर्चा झाली. त्यात बहुमत नसल्यामुळे कोणत्या तरी एका पक्षाची मदत घ्यावी लागणार होती. तसे संकेत मिळत होते. त्यावर कोअर कमिटीने विचार केला आणि हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. भाजपला ८२ जगा असल्याने स्थायी समिती, सुधर समिती मध्ये संख्याबलाप्रमाने शिवसेना भाजपला समान जागा मिळणार असल्याने आम्ही महापालिकेत पारदर्शकतेचा अजेंडा कायम ठेवणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले आहे.