भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंविरुद्ध गुन्हा

0

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना ‘लक्ष्मीदर्शना’चा सल्ला चांगलाच भोवला आहे. लक्ष्मी दर्शनासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दानवेंच्या विरोधात पैठणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामुळे दानवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पैठण नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ 17 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी ‘लक्ष्मीदर्शना’संबंधी वक्तव्य केले होते. ‘निवडणुकीच्या एक दिवस आधी लक्ष्मी दर्शन होत असते आणि अशी लक्ष्मी जर घरी चालून आली, तर तिला परत करू नका, उलट तिचे स्वागत करा,’ असे वक्तव्य दानवे यांनी केले होते. या वादग्रस्त वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने रावसाहेब दानवे यांना नोटीस बजावली होती. आयोगाने पाठवलेल्या नोटिशीनंतर दानवेंनी निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण दिले होते. मात्र दानवे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाने निवडणूक आयोगाचे समाधान झाले नाही. त्यामुळे बुधवारी रावसाहेब दानवेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे पैठणमधील पोलिस ठाण्यात दानवेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.