भाजप नगरसेवकाची वाहतूक पोलिसांना दमदाटी

0

पुणे । नो पार्किंगमध्ये कार उभी केल्याने कारवाई करणार्‍या वाहतूक पोलीस अधिकार्‍याला भाजपच्या एका नगरसेवकाने दमदाटी केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी जंगली महाराज रस्त्यावर घडला. याप्रकरणी नगरसेवक अमोल रतन बालवडकर (रा. बालेवाडी) आणि चालक गणेश वसंत चौधरी (रा. बालेवाडी) या दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक शंकर डामसे हे शिवाजीनगर वाहतूक विभागात कार्यरत असून, त्या परिसरात वाहतूक नियमनाचे ते काम करतात. सोमवारी ते सहकारी कर्मचार्‍यांना घेऊन जंगली महाराज मंदिरासमोर नो पार्किंग आणि नो-होल्टींगबाबत विशेष कारवाई करत होते. त्यावेळी चौधरी नो-पार्किंगमध्ये कार उभी करून कारमध्ये गेम खेळत बसला होता. डामसे यांनी त्याला तेथून कार काढण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या चौधरीनेे पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वारंवार सांगूनही तो पोलिसांशी वाद घालत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या कारला लोखंडी जॅमर लावले आणि पुढील कारवाईसाठी निघून गेले. ही बातमी बालवडकर यांना समजताच त्यांनी डामसे यांना फोन करून नगरसेवक असल्याचे सांगितले. गाडीवर कारवाई करू नये, तुम्हाला पाहून घेतो, अशी दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणला.

दरम्यान, नगरसेवकाने त्याचा पदाचा गैरवापर करून पोलिसांना दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी डामसे यांनी बालवडकर आणि चौधरी विरोधात गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक एस. बी. पाटील याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.