भाजप आमदार आशिष देशमुखांचा विधानसभाध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द

0

मुंबई-भाजपाचे नागपूर जिल्ह्यातील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी काल आमदारकीचा राजीनामा दिला. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान आज देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेत त्यांच्याकडे राजीनामा सोपवला.

राजीनामा दिल्यानंतर वर्ध्यामध्ये काँग्रेसच्या जाहीसभेत व्यासपीठावर हजेरी लावल्याने आशिष देशमुख यांची काँग्रेस प्रवेश नक्की मानला जात आहे. आशिष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची मंचावर जाऊन भेट घेतली होती.

आशिष देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. बऱ्याच काळापासून ते भाजपामध्ये नाराज होते. अनेकदा त्यांनी उघडपणे भाजपाच्या धोरणांवर टीका केली होती. त्यामुळे ते लवकरच भाजपामधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. मंगळवारी अखेर त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. गांधी जयंतीचे औचित्य साधून त्यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला.

आशिष देशमुख यांना आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, यापूर्वी त्यांच्या काटोल मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केले आहे. आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख हे शरद पवार यांचे राजकीय विरोधक होते. तर राष्ट्रवादी हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यास तयार नाही.

आशिष देशमुख काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून आमदारकी मिळवली होती.

Copy