भाजपा नगरसेवक पिंटू ठाकूर म्हणाले : नगराध्यक्षांच्या दालनात 2 रोजी आत्मदहन करणार

0

भुसावळ : एकहाती सत्ता असलेल्या पालिकेतील भाजपा सत्ताधार्‍यांना सत्ताधारी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी विकासकामे होत नसल्याने आत्मदहनाचा इशारा दिल्याने भुसावळच्या राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील कालिमाता मंदिर, हनुमान मंदिर, बौध्द विहार, मशीद परीसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, राष्ट्रीय महामार्ग ते गौरक्षण पर्यंत मुख्य गटारीचे बांधकाम, बौध्द विहारासमोरील सभा मंडप अशा विविध विकासकामांना मान्यता करीता नगराध्यक्ष रमण भोळे यांचे फार्म नंबर 4 वर स्वाक्षरी लागते मात्र ते स्वाक्षरी करीत नसल्याने नगराध्यक्षांच्या आडदांड, कपटी व खुनशी प्रवृत्तीला कंटाळून विकास कामांसाठी 2 मार्च रोजी नगराध्यक्षांच्या दालनात स्वत:च्या अंगावर रॉकेल, पेट्रोल टाकून आत्मदहन करेल, असा इशारा नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी दिल्याने भुसावळात खळबळ उडाली आहे.

नोव्हेंबरपासून स्वाक्षरीची प्रतिक्षा
ठाकूर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार नोव्हेंबर 2020 पासून विकासकामांची प्रकरणे नगराध्यक्ष भोळे यांच्या तांत्रिक मंजूरीसाठी नंबर 64 च्या फार्मवर स्वाक्षरी करीता प्रलंबीत आहेत. या प्रकरणांवर स्वाक्षरीसाठी भोळे यांना वारंवार विनंती केली. तसेच मुख्याधिकारी तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्विय सहाय्यकांच्या मार्फत विनंती करुनही ते स्वाक्षरी केलेली नाही.

आरोप करणे दुर्दैवी बाब : नगराध्यक्ष
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नागरीकांसमोर अशा प्रकारचे प्रसिध्दी स्टंट करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न असू शकतो. सर्व नगरसेवकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न नगराध्यक्ष या नात्याने करावा लागतो. यापूर्वी त्यांनी विकासकामांसाठी किडनी विकण्याचे स्टंड करून माझ्यावर आरोप केले होते. ठाकूर यांच्या प्रभागात अनेक कामे झाली सध्या कोट्यवधींची विकासकामे सुरू असून त्यांच्याकडून झालेले आरोप ही दुर्दैवी बाब असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले.