भाजपाच्या मोर्चाने वरणगाव दणाणले

पाणी योजनेचे काम तातडीने करा : माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची मागणी

वरणगाव : भाजपा सरकारने वरणगावकरांसाठी 24 तास पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी 25 कोटींची योजना मंजूर केली मात्र महाविकास आघाडी सरकारने विविध अडथळे आणल्याने आज योजनेचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यातच आता ठेकेदाराकडून सहा महिन्यांपासून जलकुंभाचे संथगतीने सुरू असल्याने ही कामे जलदगतीने व्हावेत, पाईप लाईनसाठी रस्ते खोदले जात असल्याने रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी वरणगाव भाजपातर्फे वरणगाव नगरपरीषदेवर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासक तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. मागण्यांबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्‍वासन सुलाणे यांनी मोर्चकर्‍यांना दिले.

उद्यानाचे काम करणार्‍या ठेकेदाराला काळ्यात यादीत टाका
भाजपाने प्रशासनाला दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करावी, नारीमळा विकास कॉलनी, शिवाजी नगर, पवन नगरासह इतर मंजूर पाण्याच्या टाकीचे काम जलद गतीने सुरू करावे, वरणगाव शहरात उद्याने मंजूर झाले असून पाच वर्षांसाठी देखभाल-दुरुस्तीचा करार नगरपरीषद व ठेकेदारांध्ये झाला असतानाही ठेकेदारांनी बगीच्याची कामे अर्धवट सोडून नगरपरिषदेच्या तोंडाला पाने पुसल्याने संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे व गार्डन जनतेच्या सेवेत खुले करावे, शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने फवारणी व धुरळणी करावी तसेच स्वछता करावी, जलशुद्धीकरण केंद्रातील प्युरीफाय यंत्र सुरू करावे, क्लोरीनयुक्त शुद्ध पाणी जनतेला द्यावे या मागणीसाठी भाजपाच्या वतीने नगरपरीषदेवर मोर्चा आणण्यात आला.

जलदगतीने काम करण्याचे आश्‍वासन
प्रशासक राजवटीत वरणगाव शहराचे विकासाच्या बाबतीत तीन तेरा झाले असल्याने प्रांताधिकारी तथा प्रशासक रामसिंग सुलाणे यांच्या समोर महिला व मोर्चेकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने करण्यासह उद्यानाबाबत कारवाई करण्याचे आश्‍वासन मोर्चेकर्‍यांना दिले.

यांचा मोर्चात सहभाग
भाजपाच्या मोर्चात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, हाजी अल्लाउद्दीन सेठ, भाजपाध्यक्ष सुनील माळी, नटराज चौधरी, डी.के.खाटीक, साबीर कुरेशी, ईरफान पिंजारी, मुस्लिम अन्सारी, फहिम शेख, मिलिंद भैसे, कमलाकर मराठे, आकाश निमकर, ज्ञानेश्वर घाटोळे, पप्पू ठाकरे, प्रणिता पाटील, संगीता माळी, मंदा थटार, पालवे, बळीराम सोनवणे, रमेश पालवे, अझर उल्ला, शंकर पवार, अरुण बावणे, डॉ.चंदने, कृष्णा माळी, गंभीर माळी, दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विवेक शिवरामे व नागरीक उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन प्रशासक रामसिंग सुलाणे यांनी स्वीकारले. वरणगाव पालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख, गणेश चाटे प्रसंगी उपस्थित होते.

Copy