Private Advt

भाजपाच्या दारुण पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी चक्क हरीद्वारचे तिकीटच काढले !

कोल्हापूर : कोल्हापूरातील पोटनिवडणुकी कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यातच भाजपा उमेदवाराचा पराभव झाल्यास कोल्हापूरची ‘निवडणूक हरलो तर हिमालयात जाईल’ म्हणणार्‍या चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी वक्तव्याची आठवण करून दिली आहे. कोल्हापुरात पोटनिवडणूक घ्या, त्या निवडणुकीत पराभव झाला, तर राजकारण सोडून हिमालयात जाईन, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पराभवानंतर विरोधकांनी पाटलांना त्यांच्या विधानाची आठवण करून दिली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर थेट पाटील यांच्यासाठी हरीद्वाराचं तिकीट काढल्याने या बाबीची चांगली चर्चा रंगत आहे.

भाजपा उमेदवाराचा दारुण पराभव
काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसनं विजय मिळवला आहे. जाधव यांच्या पत्नी जयश्री यांनी जवळपास 19 हजार मतांनी विजय मिळवला आहे. जयश्री जाधव यांना 96 हजार 226 मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना 77 हजार 426 मतं मिळाली आहेत.

प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात भाजपाचा एकही नाही आमदार
कोल्हापुरात विधानसभेचे 10 मतदारसंघ आहेत. पण जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. मात्र त्यांच्याच जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसल्याची परीस्थिती आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक लागल्यानं भाजपला संधी होती मात्र काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या व्यूहनीतीपुढे भाजपचा निभाव लागला नाही.

राष्ट्रवादीने काढले थेट हरीद्वारचे तिकीट
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजा राजापुरकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मुंबई ते हरिद्वार थ्री टायर एसी तिकीट काढलं आहे. हरिद्वारपासून हिमालयपर्यंत खेचर सेवा मिळण्यासाठीही बोलणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. पाटील यांना त्रास होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठी थ्री टायर एसीचे तिकीट काढल्याचं राजापुरकर म्हणाले.