भाजपाच्या आंदोलनात सहभाग नोंदवत माजी मंत्री खडसेंचा चर्चांना पूर्णविराम

3

मुक्ताईनगर : पक्षाकडून सातत्याने होणारा अन्याय व विधान परीषद निवडणुकीतही स्थान न दिल्याने नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे शुक्रवारी भाजपाच्या आंदोलनात सहभागी होतात वा नाही? याकडे लक्ष लागले असतानाच त्यांच्यासह खासदार रक्षा खडसे यांनी कोथळी, ता.मुक्ताईनगर येथे भाजपाच्या आंदोलनात सहभागी होत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

जनता मरणाच्या दारात : कोथळीत झळकले फलक
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करून, सरकारला जाब विचारण्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे.
सरकार विरोधात शुक्रवारी भाजपातर्फे ठिकठिकाणी पदाधिकार्‍यांनी आपापल्या घराबाहेर आंदोलन केले. आंगण ते रणांगण अशा शिर्षकाखाली राज्यातील अनेक भाजपा नेते आणि कार्यकत्यांनी आंदोलन छेडले. कोथळी येथे माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे, खासदार रक्षा खडसे यांनी आंदोलन केले. राज्यात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या, आरोग्य व्यवस्थेचा उडलेला बोजावारा, कापूस उत्पादकांना योग्य तो दर दिला जावा, असे मजकूर असलेले फलक हातात घेवून उद्धव ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, नारायण चौधरी, योगेश कोलते, उमेश राणे, संदीप देशमुख, आसीफ बागवान व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Copy