भाजपाचे रास्तारोको आंदोलन

0

मुक्ताईनगर । महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमाहद्दीवर तपासणी नाक्यासाठी स्थानिकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. जमीन संपादनाच्या मोबदल्यात स्थानिक उमेदवारांना तसेच प्रकल्पबाधितांच्या वारसांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत हमी देण्यात आली होती. मात्र कंपनीकडून स्थानिक तसेच प्रकल्पबाधित शेतकर्‍यांच्या वारसाऐवजी बाहेरील तरुणांना रोजगाराच्या संधी दिल्या जात असल्याने भाजपतर्फे शुक्रवार 13 रोजी तपासणी नाक्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी कंपनी व्यवस्थापकांनी आंदोलकांशी चर्चा करुन सदरच्या मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठवून लवकरच यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

या आहेत मागण्या
स्थानिक उमेदवार व प्रकल्प बाधितांच्या वारसांना त्वरीत कामावर घ्यावे. बाहेरील कर्मचार्‍यांना त्वरीत कमी करावे. पुरनाडमार्गे होणारी चोरटी वाहतूक थांबवावी. अंडर लोड गाड्यांमधून होणारी एन्ट्रीची लूट थांबवावी. वजन काट्यातील तफावत दूर करुन वाहनधारकांची लूट थांबवावी. तपासणी नाक्यावर एटीएम मशिन पुरवावी. ड्रायव्हर, क्लिनरसाठी रहिवास सुविधा, उद्यान, जनरल स्टोअर्स, कॅन्टीन, पिण्याचे पाणी, पंक्चर जोडणी दुकान, स्वच्छतागृहे आदी सोयीसुविधा पुरविण्यात याव्या.

आश्‍वासनाने आंदोलन मागे
सदर कंपनीचे व्यवस्थापकांनी या मागण्यांवर लवकरच विचार केला जाईल, असे आश्‍वासन दिल्याने तूर्त आंदोलन मागे घेण्यात आले. कंपनीला जर मागण्यांचा विसर पडला तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा योगेश कोलते व भाजपा पदाधिकार्‍यांनी दिला आहे.
या निवेदनावर तालुका सरचिटणीस सतिश चौधरी यांची स्वाक्षरी असून यावेळी योगेश कोलते यांसह सभापती राजेंद्र माळी, संदिप देशमुख, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शकिल, सरपंच ललित महाजन, मनोज तळेले, जयपाल बोदडे, रामदास चौधरी, संजय पाटील, आसिफ बागवान, नितीन मालेगावकर, अमिन पठाण, अश्‍विन कोळी, दिपक साळुंके, शेषराव पाटील, गुणवंत पिवटे, जानकीराम पांडे, बापू लोणारी, सुपडाबाई भालेराव, लक्ष्मण भालेराव, सद्दाम शेख, पवनराजे पाटील, चंद्रकांत भोलाणे, पियुष महाजन, दिपक काभोटे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिकांवर अन्यायाची भावना
सिमा तपासणी नाका सुरु होवून दोन वर्षांचा कालावधी झालेला असूनही स्थानिक बेरोजगारांना, जमीन संपादन झालेल्या प्रकल्पबाधित, शेतकर्‍यांच्या वारसांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क कंपनीकडून टाळाटाळ होत आहे. याठिकाणी स्थानिक रहिवासी तरुणांना डावलून बाहेरील तरुणांना रोजगार दिला जात असल्याने स्थानिकांवर अन्याय हेात आहे. तरी प्रमुख मागण्यांसह सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत त्वरीत कारवाई करण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.