भाजपमध्ये ‘इनकमिंग’ सुरू

0

जळगाव । आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची धामधुम सुरू होताच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर गोटू सोनवणे यांनी आपल्या समर्थकांसह ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रसंगी जळगाव तालुक्यातील अन्य पदाधिकार्‍यांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने आगामी निवडणुकीतील समीकरण बदलणार असल्याचे मानले जात आहे.

योग्य वागणूक नव्हती-सोनवणे
या संदर्भात प्रभाकर सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शिवसेनेकडून अनेक दिवसापासून योग्य वागणूक मिळत नव्हती. कोणी मोठा झालेला त्यांना पाहावत नव्हते. आमदारकीच्या वेळेस मला ऑफर होती.मात्र त्यावेळेस ना.गुलाबराव पाटील यांना शब्द दिल्यामुळे त्याच्यासाठी काम केले. बाजार समितीला पॅनल निवडून आणले. एवढे करूनही त्यांना सन्मानाची वागणूक देत नव्हते. ज्या गटातून आम्ही कै. भिलाभाऊंच्या वारस म्हणून वहिनींना उभे करित आहोत; तेथेच त्यांनी आमच्या वहिनीच्या विरोधात पुतण्याला उभे करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. ते आमच्या परिवारासोबत येत असेल तर त्याच्यासाठी ही जागा सोडून देवू असे प्रभाकर सोनवणे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

जळगाव तालुक्यात भाजपची मोर्चेबांधणी
शिवसेना भारतीय जनता पक्षाची जिल्ह्यात युती नसल्याने दोघांनी जिल्हा परीषदेवर आपलेच वर्चस्व रहावे यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच शनिवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य प्रभाकर गोटू सोनवणे, बलवाडीचे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य पुंडलीक विठोबा पाटील, म्हसावदचे उपसरपंच भगवान सोनवणे, धानोरा बुद्रुकचे उपसरपंच पुंजु मराठे, शेतकरी संघ जळगावचे संचालक विजय दत्तात्रय पाटील, आव्हाणेचे हर्षल पाटील, जळगाव पंचायत समिती माजी सदस्य लता बारी, शिरसोली ग्रामपंचायत सदस्य विजय बारी, मोहाडी येथील पंकज तावडे यांनी भारती जनता पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर पवार, सदाशिव पाटील, मनोहर पाटील, संजय चौधरी, सुशील लाड, विलास घुगे, शालीक पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.