भाजपच्या संघर्ष यात्रेचा मीही साक्षीदार

0

पुणे : विरोधी पक्षात असताना भारतीय जनता पक्षाने काढलेल्या संघर्ष यात्रांचा मी साक्षीदार आहे. भाजपने प्रत्येक यात्रा वातानुकूलित बसमधूनच काढली होती. ती किती पंचतारांकित होती, याबाबत न बोललेलेच बरे, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. शेतकरी कर्जमाफीसाठी चंद्रपूरहून निघालेली संघर्ष यात्रा मंगळवारी सकाळी पुण्यात पोचली. त्यानंतर मार्केटयार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुंडे बोलत होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथून शेतकरी संघर्ष यात्रा सुरु झाली. मात्र, सर्व विरोधी नेते आणि आमदार वातानुकूलित वाहनांतून यात्रेत सहभागी झाल्याबद्दल टीका होत आहे. नुसते संघर्ष असे नाव देऊन संघर्ष यात्रा होत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याबाबत मुंडे याना विचारता त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

मुंडे म्हणाले, मोठ्या उद्योगपतींचे कर्ज सरकार माफ करू शकते, पण घाम गळणार्‍या शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यास नकार देते. अशा या सरकार विरोधात ही संघर्ष यात्रा आहे. त्याकडे दुर्लक्ष करून विरोधकांच्या वातानुकूलित प्रवासाबाबत भाजपकडून अपप्रचार करण्यात येत आहे. भाजपने आतापर्यंत काढलेल्या प्रत्येक यात्रेचा मी साक्षीदार आहे. भाजपची प्रत्येक यात्रा वातानुकूलित बसमधूनच काढण्यात आली होती. याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेकडे पाहावे आणि मग भाजपने विरोधकांच्या यात्रेवर टीका करावी.