भाजपच्या महिल्या पदाधिकाऱ्याची हत्या

0

नालासोपारा – भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घातला नालासोपारा येथे घडली आहे. भाजप महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण (वय ३२)यांची हत्या करण्यात आली आहे. वसई-विरारच्या जिल्हा युवती सहप्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. चव्हाण यांची हत्या दोन दिवसांपूर्वी झाली असल्याचा संशय वर्तवण्यात आला आहे. चव्हाण यांना इस्त्रीचे चटके देऊन, शॉक देऊन नंतर त्यांना ठार मारण्यात आलं असावं असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. नालासोपारा पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपीविरोधात दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील तपस्या अपार्टमेंटच्या B विंग़मध्ये रूम नंबर १०१ मध्ये रूपाली चव्हाण राहत होत्या. त्या घटस्फोटित होत्या. चव्हाण यांचे वडील जवळच राहत होते. त्या मूळच्या पुण्याच्या होत्या. दोन वर्षांपूर्वीच त्या नालासोपाऱ्यामध्ये राहायला आल्या होत्या. त्यांना 10 वर्षांचा मुलगा असून तो वडिलांकडे रहातो. चव्हाण यांनी एक दुकान घेतले होते आणि त्यात पादत्राणे विक्रीचा व्यवसाय सुरू करणार होत्या. आज चव्हाण यांच्या दुकानाचे उद्घाटन होणार होतं. मात्र त्या फोन रिसिव्ह करत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी एकास घरी जाऊन पाहण्यास सांगितलं तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी रुपाली यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. अंगावर धारदार शस्त्राच्या खुणा होत्या. दोन दिवसापूर्वी हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चव्हाण यांच्या शरीरावर वार केले आहेत. इस्त्रीचे चटके आणि विजेचा शॉक ही दिल्याच संशय आहे. अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Copy