भाजपचा विजयोत्सव आणि गडकरींच्या कानपिचक्या

0

साधारणतः अडीच वर्षांपूर्वी संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थात भाजपची लाट आलेली अद्यापही ओसरली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला अतुलनीय यश मिळाले. भाजपच्या आतापर्यंतच्या राजकीय जीवनात अशा प्रकारचे यश मिळाल्याने पक्षाच्या नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाला उधाण आले. या उधाणामुळे अनेक ठिकाणी गल्लोगल्ली, मोक्याच्या-गर्दीच्या ठिकाणी भाजप नेत्यांची पोष्टर्स दिसायला लागली.

भाजपच्या या विजयामुळे विरोधी पक्षातील अनेक स्थानिक, जिल्हा आणि विभागापुरते मर्यादित असलेले नेते पुढील राजकीय भवितव्याच्या दृष्टिकोनातून भाजपमध्ये प्रवेश करते झाले. त्यामुळे पक्षाबाहेरच्यांना प्रवेश देताना वर्षानुवर्षे काम करणार्‍या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना निर्माण होत भाजपचे काँग्रेसीकरण होत असल्याची टीका चर्चा होण्यास सुरुवात झाली.

या चर्चेची दखल भाजपमधील सर्व नेत्यांनी कितपत गंभीरपणे घेतली याविषयी दुमत असेल. मात्र, या चर्चेची दखल दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्या खालोखाल केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी आवर्जून घेतली. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांनी या अनुषंगाने प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यापासून ते स्वतःचे जास्त फोटो प्रसारमाध्यमांमध्ये येऊ देऊ नका इथपर्यंतच्या सूचना त्यांनी केल्या. त्यांची दखलही प्रसारमाध्यमांनीही घेतली. परंतु, नेहमीच्या प्रमाणे पंतप्रधांनानी सूचना केल्याचे मानत त्याकडे भाजपमधील अनेक नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत स्वप्रसिद्धीचे काम तसेच पुढे सुरू ठेवले.

महाराष्ट्रातही अशाच प्रकारचे काम अनेक नेत्यांकडून सुरू असल्याने त्याची दखल केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी घेत पिंपरी चिंचवड येथील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतच सर्वांची हजेरी घेतली. भाजपला सध्या मिळत असलेल्या विजयाने अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक नेत्यांकडून स्वतःची छायाचित्रे असलेले फोटोचे बॅनर्स लावले जात आहेत तसेच गर्दी दिसली की हात हलवताना दिसत असल्याचे बाब गडकरी यांनी सर्वांच्या नजरेस आणून दिली. त्यावरच ते न थांबता पुढे म्हणाले की, मिळणार्‍या विजयामुळे नेत्यांनी हुरळून जायचे कारण नाही. देशातील जनतेने त्या काळी देशव्यापी नेतृत्व असलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. काँग्रेसलाही पराभूत केले आहे. त्यामुळे आज मिळणारे यश उद्या राहील याची काही शाश्‍वती नसल्याची आठवण आणि कानपिचक्या देत गडकरी यांनी राज्यातील अनेक नेत्यांना जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला.

त्यातच भाजपमध्ये येणारा हा वाल्याचा वाल्मीकी होत असल्याचे सांगत निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, पक्षवाढीसाठी सर्वांनाच काम करावे लागणार असल्याची बाब अधोरेखित करत निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पदरी निराशाच राहणार असल्याची बाब त्यांनी अप्रत्यक्षरीत्या सर्वांच्याच निदर्शनास आणून दिली. परंतु, प्रदेश कार्यकारिणीतील गडकरी यांच्या भाषणाने राज्यातील भाजप नेत्यांवर कितपत परिणाम झाला याचा अंदाज सध्या तरी बांधणे अवघड असले, तरी नेमक्या त्याच्या उलट चर्चेला सुरुवात झाली आहे. गडकरींचे पक्षातील परंपरागत विरोधक तसे सद्यपरिस्थितीत शिल्लक राहिलेले नाहीत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात फारसे सख्य नसल्याच्या चर्चाही सातत्याने प्रसारमाध्यमांमधून होत आहे. त्यातच एकेकाळचे मुंडे गटाचे आणि विविध आरोपांमुळे मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागलेले एकनाथ खडसे यांच्या उघड पक्षविरोधी वक्तव्यांचीही चर्चा प्रसारमाध्यमांबरोबरच सर्वसामान्य जनतेत चांगलीच रंगत आहे.

यासर्व गोष्टींच्या अनुषंगाने तर गडकरी यांनी कानपिचक्या दिल्या नाहीत ना, अशा चर्चेला सुरुवात झाली आहे. वास्तविक पाहता भाजपमधील नेत्यांसह अनेक मंत्र्यांना आपण आता सत्ताधारी झालो आहोत यावर अद्याप विश्‍वास बसत नाही तसेच त्यांच्या अंगवळणीही पडली नाही. त्यामुळे अनेकदा कामे घेऊन येणार्‍या कार्यकर्त्यांना नेमके काय सांगावे याचे भान त्यांना राहत नसल्याचे अद्यापही दिसून येत आहे.

दिवसेंदिवस बाहेरून भाजपमध्ये येणार्‍यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. मात्र, या वाढत्या संख्येच्या बळावर पक्षासाठी वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणार्‍या कार्यकर्त्यांचे काय करायचे याचे गणित अद्याप भाजपला उमगले नाही. सत्तेत येऊन अडीच वर्षे पूर्ण होऊन तीन वर्षे पूर्ण व्हायला आली. मात्र, अनेक महामंडळावर सदस्य, सभापती, अध्यक्ष पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर केलेल्या कामाचे चीज होईल. या आशेवर राहिलेल्या भाजपमधील अनेक नेत्यांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे.

कदाचित याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप न भरलेली ही पदे भरून निष्ठावान कार्यकर्त्यांना संतुष्ट करावे असे सूचक विधान तर गडकरी यांनी केले नाही ना, अशी चर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतच सुरू झाली. मात्र, दिल्लीच्या धर्तीवर राज्यातही एकहाती कारभार हाकणारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यपद्धतीबाबत विचारणा करणार कोण, असा सवालही यानिमित्ताने विचारण्यास सुरुवात झाली आहे.

काँग्रेस पक्षाचे सरकार केंद्रात आणि राज्यात असताना काही नेत्यांकडून पक्षाचे हायकंमाड वगळता इतर बड्या नेत्यांवर काँग्रेस पक्षातील अन्य नाराज नेत्यांकडून जाहीरपणे टीका केली जायची. मात्र, भाजपमध्ये तशी सोयच नसल्याने अडून अडून टीका करण्याची नवी प्रथा गडकरींच्या निमित्ताने सुरू झाल्याची चर्चा भाजपच्या दुसर्‍या फळीतील नेत्यांमध्ये सुरू झाली आहे.

गिरिराज सावंत – 9833242586