भाजपचा धुव्वा: विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी वरचढ

0

फडणवीस-चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का: नागपूर-पुणे गमावले

मुंबई: राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र असल्याने भाजपचा टिकाव लागणार नाही असे बोलले जात होते. नेमके तसेच झाले आहे. 6 पैकी भाजपने फक्त धुळे-नंदुरबारच्या एकमेव जागेवर विजय मिळविला, उर्वरित 4 जागांवर महाविकास आघाडी तर एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. नागपूर पदवीधर मतदार संघात नागपूरचे विद्यमान महापौर फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांचाही पराभव झाला आहे. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्या अनपेक्षित विजय झाला आहे. नागपूर भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. दुरीकडे पुणे पदवीधर आणि शिक्षक दोन्ही मतदार संघात भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि काँग्रेसचे प्रा.जयंत आसगावकर विजयी झाले आहेत. मराठवाडा पदवीधरमधून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी हॅट्रिक साधत तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

Copy