भाऊ आरोग्य कार्ड ; ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा आधार !

पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांचा कृतिशील पुढाकार

जळगाव : प्रतिनिधी । पालकमंत्री म्हणून समाजाचे पालकत्व सार्थ ठरवणारा कृतिशील पुढाकार घेत पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील गरजू कुटुंबांसाठी ‘ भाऊ आरोग्य कार्ड ‘ या उपक्रमाच्या लोकार्पणाची तयारी पूर्ण केली आहे. सर्वत्र गेल्या वर्षभरापासून सार्वजनिक आरोग्यास कोरोना महामारीने घट्ट विळखा घातला आहे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमअंतर्गत स्वतः जबाबदार बनून सगळेच झुंज देत आहेत. या बिकट परिस्थितीत मुख्यतः ग्रामीण जनतेचे आरोग्य रक्षणासह जीवनमान उंचावण्याच्या ध्येयासाठी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील ( भाऊसाहेब ) यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाने व जि. प. सदस्य प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आकाराला येतो आहे.
ग्रामीण भागातील तमाम जनतेसाठी मोफत “भाऊ आरोग्य कार्ड” या नावाने हा अद्वितीय उपक्रम राबविला जाणार आहे. ग्रामीण भागातील सर्व जनतेसाठी खुला असलेला हा उपक्रम राज्यात मैलाचा दगड ठरणार आहे. ग्रामीण जनतेला त्या त्या आजाराच्या निष्णात डॉक्टरांशी सहजतेने जोडणाऱ्या या ‘ भाऊ आरोग्य कार्ड ‘ उपक्रमातून गरजूंची वणवण थांबवत त्यांचा पैसाही वाचवला जाणार आहे. ‘भाऊ आरोग्य कार्ड ‘ या नावाप्रमाणेच ग्रामीण कुटुंबांना निरोगी जीवनासाठी वात्सल्य आणि मदतीचा मजबूत आधार उपलब्ध करून देणे हाच प्रामाणिक प्रयत्न आहे ‘ जगात बदल घडवण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्नही खूप मोठा असतो ‘ ही गुलाबभाऊंची शिकवण प्रत्यक्षात आणण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे .
भाऊ आरोग्य कार्डाची संकल्पना व प्रमुख उद्दिष्टे
खाजगी रुग्णालयामध्ये होणाऱ्या खर्चाचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी व्हावा म्हणून रुग्णालयाच्या बिलात १० ते १०० टक्यांपर्यंत आर्थिक सूट मिळवून देणे. तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सोयी सुविधा सहज उपलब्ध करून लाभ मिळवून देणे. ऑनलाईन पद्धतीने भाऊ आरोग्य कार्डाची नोंदणी करता येते. त्यासाठी www.gpfcares.org या संकेतस्थळावर आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली आहे. सहकार्य, सेवा आणि विकास या तत्वावर आधारित प्रत्येक घराघरात निरोगी आरोग्य व संकटसमयी आधार उपलब्ध करून देणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे. भाऊ आरोग्य कार्ड नोंदणी प्रक्रिया भाऊ आरोग्य कार्डचे लाभ घेण्यासाठी प्रथम संकेस्थळावरील “संपर्क” वर क्लिक करून उपलब्ध असलेल्या कार्यालयीन पत्त्यावर अथवा ऑनलाईन नमुना फॉर्म भरून आपल्या कुटुंबातील सदस्यांची योग्य माहिती देवुन नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज करतेवेळी कुटुंबातील सदस्यांचा आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड ई. कागतपत्रे जोडणे अनिवार्य आहे. नोंदणीकृत परिवारातील कुटुंब प्रमुखास विहित नमुन्यात कार्डचे वितरण करण्यात येईल. प्रत्येक कार्ड धारकास विविध आरोग्यसेवेचा लाभ घेण्यासाठी विकल्प म्हणून प्रत्येक विद्याशाखेच्या विशेषज्ञ डॉक्टरांची संपूर्ण माहिती (डॉक्टरांचे नाव, दुरध्वनी क्रमांक, शैक्षणिक पात्रता, उपचार विशेषज्ञता व उपलब्ध सोयी सुविधा, श्रेणीनुसार आर्थिक सूट, तपासणी फी, तसेच रुग्णालयाचा पत्ता) ही या संकेतस्थळावर “विशेषज्ञ डॉक्टर्स” येथे क्लिक करून उपलब्ध आहे. या उपलब्ध माहिती नुसार डॉक्टर व रुग्णालय निवडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य हे कार्ड धारकांचे असेल. भाऊ आरोग्य कार्ड वापराचा अधिकार हा संबंधित कार्ड धारक व त्यांच्या कुटुंबातील रेशनकार्ड वरील सदस्यांसाठीच गृहीत धरलेला असून रुग्णाने स्वतःची ओळख असलेले कागदपत्रे (आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन परवाना, ई. फोटो आयडी) व सदर कार्ड रुग्णालयात आल्यानंतर उपचारापूर्वीच दाखविणे बंधनकारक असेल. कार्डाची लाभ मिळवण्याची मुदत प्रथमतः ३ वर्ष असेल. राष्ट्र धर्म सर्वोपरी मानून या कठीण काळात लोकसेवा करण्याचा हा छोटासा प्रामाणिक व कृतिशील प्रयत्न… अर्थात आपल्या सहकार्य व सहभागाशिवाय हा यज्ञ पूर्ण होणे नाहीच. म्हणूनच आपल्या सर्वांच्या सहकार्याची व सहभागाची अपेक्षा आहेच. मोफत कार्ड नोंदणी तसेच अधिक माहितीसाठी ग्रामीण कुटुंबांनी www.gpfcares.org या संकेतस्थळावर भेट देऊन संपर्क करून जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख सीए. हितेश किशोर आगीवाल व प्रकल्प समन्वयक मुकुंद गोसावी यांनी केले आहे.