Private Advt

भवरलाल एँड कांताई जैन फाऊंडेशन ‘वंदे भारतम्-नृत्य उत्सव’ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर

 

जळगाव दि. 17 (प्रतिनिधी)- सांस्कृतिक मंत्रालय आणि रक्षा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ‘वंदे भारतम्-नृत्य उत्सव’ ही अखिल भारतीय नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. देशभरातील सर्वोत्तम नृत्य प्रतिभा निवडणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. निवड झालेल्या कलावंताना 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त संपन्न होणाऱ्या परेडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान स्वप्रतिभेचा आविष्कार सादर करण्याची संधी मिळावी हासुद्धा हेतू या आयोजनामागे आहे. भारतीय युवापिढीने आपला समृद्ध वारसा जपताना संस्कृतीशी त्यांचं नातं घट्ट जोडणे हे महत्त्वपूर्ण राष्ट्रीय एकात्मता अनुबंधित करणारं ध्येय या आयोजकांचे आहे.

प्रस्तुत स्पर्धेत क्लासिकल, फोक (लोकनृत्य), ट्रायबल आणि फ्यूजन/कंटेम्पररी या चार नृत्य प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. ही स्पर्धा जिल्हा, राज्य, झोनल आणि राष्ट्रीय स्तर अशा चार टप्प्यात विभागण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी जळगाव जिल्हातील १५ नृत्य सादर करण्यात आली. त्यातून १२ नृत्यांची निवड झाली. राज्यस्तरीय स्पर्धेत देशातील २८ राज्य सहभागी होते. महाराष्ट्राचे ३४ नृत्य सादर करण्यात आले त्यातूनही १२ नृत्यांची निवड झाली. त्यानंतर झोनलस्तरीय स्पर्धेत ७ राज्यचे एकूण ३८ नृत्याचे सादरीकरण झाले. त्यातून फक्त १५ नृत्यांची निवड करण्यात आली. अभिमानास्पद बाब म्हणजे, भवरलाल एँड कांताई जैन फाउंडेशनने सर्व स्पर्धांमध्ये यश प्राप्त केले. आणि १९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत नृत्य सादर करणार आहेत.

राष्ट्रीयस्तरावरील ‘वंदे भारतम्-नृत्य उत्सवा’त भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलित अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे माजी विद्यार्थी सहभागी झाल्याचा आनंद अधोरेखित करण्यासारखा. महान उद्योजक श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंनी सामाजिक बांधिलकीच्या अंत:प्रेरणेने विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक. यातील शैक्षणिक उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग या दृष्टीने अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलकडे पाहिले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजघटकातून विद्यार्थ्यांची रितसर निकषांनुसार निवड करून अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये प्रवेश दिला जातो. प्रज्ञा-प्रतिभेच्या विकसनासोबत विद्यार्थ्यांच्या अंतरंगातील सुप्त कलागुणांना शालेय स्तरावरील विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रोत्साहित केले जाते. पाठ्यपुस्तकातील नियमित अभ्यासक्रमातही अनुभूतीचे विद्यार्थी विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण होतात, शिवाय शालेय छंद वर्गातून कलानिपुणतेचा सर्वांग सुंदर आविष्कारही करतात.

राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी भवरलाल एँड कांताई फाऊंडेशनतर्फे नृत्य सादर करणारे कलावंत:

वेदांत बांगडे, हेमंत माळी, विरेंद्र ताडे, उमेश झुरके, ललित हिरे, पवन खोडे, सनी शेटे, सचिन राजपूत, रोशन पवार, निकेश जाधव, रोहन चव्हाण, सुमीत भोये, मंगेश चौधरी, निर्मल राजपूत, रितीक पाटील हे आहेत. ज्ञानेश्वर सोनवणे (नाना सर) यांनी नृत्य शिक्षक आणि सौ. रुपाली वाघ यांनी संघ प्रमुख या नात्याने जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी भवरलाल अँड कांताई फाऊंडेशनतर्फे नृत्य सादर करणाऱ्या कलावंतांना फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. अशोकभाऊ जैन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.