भर दिवसा लूट करून पसार होणार्‍या मालेगावातील दरोडेखोरांना अखेर बेड्या

Broad daylight robbery at Wayla Phata : Six robbers from Malegaon in Muktainagar police’s net  मुक्ताईनगर : भर दिवसा रीक्षा चालकाला लुटून पसार होण्याच्या प्रयत्नातील मालेगावातील अट्टल दरोडेखोरांना मुक्ताईनगर पोलिसांनी नाकाबंदी करीत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी मुक्ताईनगर-कुर्‍हारस्त्यावरील वायला फाट्याजवळ बुधवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास रीक्षा चालकास लुटून पळ काढला मात्र चालकाने ग्रामस्थांसह पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान आरोपींना अटक केली तसेच त्यांच्या ताब्यातील एअर गनही जप्त करण्यात आली.

रीक्षा पुढे चारचाकी लावत केली लूट
बुधवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास वायला फाट्याजवळ तक्रारदार तथा रीक्षा चालक देविदास रामदास तायडे (40, चिंचखेडा) हे रीक्षाने जात असताना वायला फाट्याजवळ आरोपींनी स्वीप्ट कार (क्रमांक एम.एच. 02 बी.झेड.8938) रीक्षाच्या बाजूला आणून सुरूवातीला रस्त्याबाबत विचारपूस केली व काही कळण्याआत तायडे यांना रीक्षातून खाली ओढत कारमध्ये बळजबरीने बसवण्याचा प्रयत्न केला. तायडे हे त्यांच्या तावडीतून सुटकेसाठी प्रयत्न करताना त्यांच्या शर्टाच्या खिशातील सोळाशे रुपये व मोबाईल आरोपींनी जबरीने काढून घेतले तसेच त्यांना सर्वांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तायडे यांनी गावकर्‍यांना माहिती दिल्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पुर्णाड फाट्याजवळ दोन ट्रक आडवे लावून पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतर सुसाट वेगातील कार आल्यानंतर आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.

मालेगावातील अट्टल आरोपींना अटक
मुक्ताईनगर पोलिसांनी हुसेन गुलाम रसूल शहा (21), शेख समीर शेख शकील (20), फैयाज खान रियाज खान (20), शेख तौसीफ शेख शकील (20), रीजवान शहा रफिक शहा (20), आमीर खान शब्बीर खान (21, सर्व रा.मालेगाव, जि.नाशिक) यांना अटक केली. तपास पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहेत.