भर दिवसा एकाचा गळा आवळून खून

0

कळमसरे येथे उसनवारीच्या पैशांवरून वाद उद्भवला*
शिरपूर: तालुक्यातील कळमसरे गावात उसनवारीने दिलेल्या पैशांवरून झालेल्या किरकोळ वादातून भर दिवसा एकाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, 16 जून रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील कळमसरे गावातील ताराचंद देवचंद भिल यांच्या घरासमोर मयत धर्मा अभिमन भिल व संशयित सुरेश गुमानसिंग पावरा (रा.जुना करवंद रोड, कळमसरे) यांंच्या उसनवारीचे 200 रूपये परत देण्याच्या कारणावरून दोघात शाब्दिक भांडण सुरू होती. अचानक धर्मा भिल व सुरेश पावरा यांच्यात भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले. धर्मा भिल यास जमिनीवर खाली पाडून त्याच्या छातीवर बसुन सुरेश पावरा हा जोरजोरात हाताबुक्यांनी मारहाण करत गळा दाबत शिवीगाळ करीत ‘माझे दोनशे रुपये दे, नाहीतर तुला मारून टाकेल’ असे जोरजोरात ओरडत होता. त्या दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकुन तेथे राहणारे ताराचंद देवचंद भिल, जसोदा देवचंद भिल, सखुबाई मच्छिंद्र भिल आदींसह सर्वजणांनी घटनास्थळी धाव घेतली.गर्दीला पाहून संशयित सुरेश पावरा हा त्या घटनास्थळावरून पळाला. त्याचा इतर लोकांनी पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो शेतात फरार झाला.

डॉक्टरांनी तपासणी करून केले मयत घोषित
त्यानंतर घटनास्थळी संतोष भिल यांच्यासह सखुबाई व मच्छिंद्र भिल यांनी धर्मा भिल याची छाती दाबुन पाहिली असता धर्मा भिल याने काही एक हालचाल केली नाही. त्यास संतोष भिल यांनी त्याच अवस्थेत घरी नेले. पत्नी गंगाबाई हिने पती धर्मा भिल याच्या तोंडावर पाणी मारून बघितले असता काही एक हालचाल केली नाही. त्यामुळे धर्मा भिल यास उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी भुरीबाई जंगल भिल रा.कळमसरे यांच्या फिर्यादीवरून संशयित सुरेश पावरा याच्या विरूध्द शिरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.