Private Advt

भरधाव वाळू वाहतूक करणार्‍या ट्रकची धडक : अमळनेरचा दुचाकीस्वार ठार

अमळनेर : वाळूची वाहतूक करणार्‍या भरधाव ट्रकने धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात शहरातील 49 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, 16 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पैलाडजवळ घडला. या अपघातात दुचाकीस्वार बापू लोंढू पाटील (49, रा. ताडेपुरा, अमळनेर) यांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
अमळनेर शहरातून धरणगावकडे वाळू वाहतूक करणारा ट्रक (एम.एच.21 एक्स.8128) ने बापू पाटील यांच्या दुचाकीला वळण घेत असताना मागून धडक दिल्याने बापू पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. अमळनेर पोलिस स्टेशनचे सहा.निरीक्षक राकेश परदेशी, हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम पाटील, मिलिंद भामरे, सुनील पाटील, सूर्यकांत साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ट्रक पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयत बापू पाटील हे हातमजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परीवार आहे.