भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले : पिंपळगावचे दोघे चुलतभाऊ ठार

भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील जाडगाव फाट्यानजीक भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील दोघे तरुण चुलतभाऊ ठार झाले. रविवारी दुपारी चार वाजता हा अपघात झाला. सोपान रमेश मावळे (19) व सचिन सुभाष मावळे (18) अशी मयतांची नावे असून अपघातप्रकरणी ट्रक चालकाविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

महामार्गावर अपघातांचे सत्र कायम
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सोपान रमेश मावळे (19) व सचिन सुभाष मावळे (18) दोघे तरुण दुचाकी (एम.एच.14 सी.टी. 4798) ने दीपनगर येथून घरी परत येत असताना जाडगाव फाट्यानजीक समोरून येणारा ट्रक (एम.एच.15 एफ.व्ही.1413) ने जोरदार धडक दिल्याने सचिन हा जागीच ठार झाला तर सोपान यास गंभीर अवस्थेत वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवत असताना त्याचीही प्राणज्योत मालवली. अपघातस्थळावरून चालक ट्रक चालक पसार झाला.