Private Advt

भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले : पिंपळगावातील दुचाकीस्वार जागीच ठार

भुसावळ/पाचोरा : पाचोरा तालुक्यातील वरखेडी जवळील सरकारी दवाखान्यासमोर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेनंतर पिंपळगाव येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी घडला.भंगलाल गोविंदा राठोड असे मयताचे नाव आहे.

ट्रकने दिली धडक
पिंपळगाव हरेश्वरकडून मोसंबीने भरलेला ट्रक (क्रमांक एच. पी. 17 यु. 7285) हा ट्रकचालक महेंदरसिंग रघुवीरसिंग हा पाचोरा शहराकडे शनिवारी दुपारी दिड वाजता घेऊन जात असतांना याचवेळी वरखेडी बसस्थानकाकडून वरसाडे येथील रहिवासी व ग्रामविकास मंडळाचे माजी संचालक पिंपळगाव (हरेश्वर) तथा वरसाडा तांड्याचे नाईक भंगलाल गोविंदा राठोड हे आपल्या दुचाकी (एम.एच.20 ए.जे. 5000) वरून पिंपळगाव हरेश्वरकडे जात असतांनाच वरखेडी येथील शासकीय रुग्णालयासमोर ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्यामुळे दुचाकीस्वार भंगलाल राठोड हे जागीच ठार झाले.

अपघातानंतर अनेकांची धाव
ही घटना घडताच वरखेडी येथील ग्रामपंचायत सदस्य, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेश चौधरी, शशिकांत पाटील (राजुरी), दिनेश पाटील (शिंदाड), गोरख जाधव, समाधान भोई यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी रुग्णवाहिका आणण्यात आली, परंतु तोपर्यंत दुचाकीस्वार भंगलाल राठोड यांची प्राणज्योत मालवली होती.

अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी घेतली ताब्यात
अपघाताची माहिती पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळताच पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी पोलिस हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील व सहकार्‍यांना पाठवून अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह पाचोरा नगरपालिकेच्या दवाखान्यात पाठवला. दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक व चालकाला ताब्यात घेतले आहे.