Private Advt

भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरचे टायर फुटले : अपघातात दीपनगरातील सुरक्षा रक्षकाचा अपघाती मृत्यू

भुसावळ : दीपनगरातील कर्तव्य बजावून घराकडे निघालेल्या सुरक्षा रक्षकाचा 35 फूट पुलावरून पडल्याने मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सकाळच्या सुमारास घडला. कैलास शामसिंग पाटील (49, खडका, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाटील हे दुचाकीवरून घरी येत असताना बाजूने चालणार्‍या टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचे टायर फुटून ते पाटील यांच्या अंगावर उडाले व पुलावरून ते कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला तर सहकारी राहुल दिलीप पाटील जखमी झाले आहेत. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

अचानक टायर फुटले
खडका गावातील रहिवासी कैलास पाटील हे दीपनगरात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारची रात्र पाळी संपवून ते गुरूवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घराकडे येण्यासाठी दुचाकीवरून राहुल दिलीप पाटील (35) यांच्यासोबत निघाले मात्र फेकरी उड्डाण पूलावरून भुसवळकडून वरणगावकडे जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीचे चालकाकडील पुढचे टायर फुटले व समोरून येत असलेल्या कैलास पाटील यांच्या दुचाकी (एम.एच.19 ए.के.2683) वर धडकल्याने कैलास पाटील यांची दुचाकी उड्डाणपुलावर पडली मात्र पाटील हे थेट गाडीवरून पूलावरून खाली फेकले गेले. सुमारे 35 फुट उंचीच्या पूलावरून पाटील खाली पडल्याने जागेवरच त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत मोटर सायकलीवर मागे बसलेले राहुल दिलीप पाटील (35) हे पुलावरच पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत.मृत कैलास पाटील यांच्यावर गुरूवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, दोन भाऊ, सून, जावाई असा परीवार आहे.