Private Advt

भरदिवसा 40 हजारांची रोकड लांबवली : किनगावातील प्रकार

भामट्यांनी दुकानाबाहेरील 40 हजारांची रोकड असलेली पिशवी लांबवली

यावल : तालुक्यातील किनगाव येथील भुसार मालाची विक्री करणार्‍या दुकानातून बुधवारी भर दिवसा भामट्याने 40 हजार रुपयांची रोकड असलेली थैली लांबवली. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील किनगाव येथे नरेंद्र आबाजी पाटील यांच्या मालकीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाच्या परीसरात साई ट्रेडर्स हे भुसार मालाचे दुकान आहे. बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास दोन चोरटे त्यांच्या दुकानासमोर आले. त्यांनी तेथे थोडा वेळ उभे राहून आणि बसून टेहळणी केली. यानंतर यातील एका चोरण्याने अगदी क्षणार्धात त्यांनी बाहेर ठेवलेली पिशवी उचलून पोबारा केला. यानंतर त्याचा साथीदारही तेथून गायब झाला. या थैलीमध्ये सुमारे 40 हजार रुपयांची रोकड होती. चोरीची माहिती मिळताच यावलचे पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार व सहकार्‍यांनी घटनास्थळी दाखल होत चौक्शी केली. या प्रकरणी नरेंद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार विजय पाचपोळ करीत आहेत.