Private Advt

भरदिवसा वराड-विटनेर रस्त्यावर पिस्टल लावत सव्वा लाख रुपये लुटले

जळगाव : बचत गटाचे पैसे वसूली करणाऱ्या खाजगी बँक व्यवस्थापकाच्या डोक्यावर पिस्तूल ठेवत त्याच्याकडून बॅगेतील रोकड आणि मोबाईल टॅब असा एकूण १ लाख १४ हजार ६२९ रुपयांच्या मुद्देमालाची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार विटनेर गावाच्या रस्त्यावर घडला. या घटनेमुळे जळगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील शेषराव पाढाळे (26 रा. रहिमाबाद, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद, ह.मु. हिवरखेडा रोड, जामनेर) हे जामनेर येथील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड अर्थात एनबीएफसी या बँकेत केंद्र व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहे. त्यांच्या बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना लघु उद्योगासाठी कर्ज दिले जाते. दिलेले कर्ज वसुलीसाठी त्यांनी शाखेमार्फत १० कर्मचारी नेमले आहे. त्या माध्यमातून ते जिल्ह्यातील ३५ केंद्रातून माध्यमातून बचत गटातून पैसे वसूलीचे काम करतात. सुनील पाढाळे हे मंगळवार, २२ मार्च रोजी कर्जाची रक्कम वसूली करण्यासाठी वराडमार्गे लोणवाडी येथे दुचाकी क्रमांक (एम.एच. २० डी.जे.१६६०) ने गेले. त्यांनी पाच महिलांकडून एकूण ९५ हजार ८७३ रुपयांची वसुली करून दुपारी १२ वाजेच्या सुमारास वराडमार्गे विटनेरकडे दुचाकीने निघाले. दुपारी १ वाजेच्या सुमारास वराड आणि विटनेर गावाच्या रस्त्यावर असलेल्या रस्त्याने जात असताना त्यांच्यामागून अज्ञात तीन व्यक्ती दुचाकीने पाठलाग करत आले. सुनील पाढाळे यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे गेले. आणि तिघे दुचाकी समोर अचानक आल्याने सुनील यांनी अचानक ब्रेक लावला व ते खाली पडले. त्यानंतर दुचाकीवरील तिघांनी त्यांच्याजवळ येऊन दोन चापटा मारल्या व त्यांच्या खांद्याला लावलेले पैशांची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुनील यांनी याला विरोध केला असता त्यातील एकाने कमरेतून पिस्तूल काढून त्यांच्या डोक्याला लावली व “बॅग सोड नाहीतर गोळी मारेल” अशी धमकी दिली. पैश्यांची बॅग जबरी हिसकावून दुचाकीवरून पसार झाले. या बॅगमध्ये ९५ हजार ८७३ रुपयांची रोकड आणि सुनील यांचा १८ हजार ७५६ रुपये किमतीचा मोबाईल टॅब असा एकूण १ लाख १४ हजार ६२९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सुनील पाढाळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली.

पोलिस अधिकाऱ्यांची धाव
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, स्वप्नील पाटील, हेमंत पाटील, प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती जाणून घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सचिन मुंडे करीत आहे.