Private Advt

भरती परीक्षा गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे – चंद्रकांत पाटील

मुंबई – राज्यातील सरकारी नोकरभरतीच्या पेपरफुटीची आणि परीक्षांमधील घोटाळ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी समर्थन केले. या घोटाळ्यांचे धागेदोरे राज्य सरकारपर्यंत जात असल्याने सीबीआयनेच याची चौकशी करणे योग्य ठरेल, असे ते म्हणाले.

    कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आरोग्य विभाग, म्हाडा आणि आता शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्यांचे धागेदोरे राज्य सरकारपर्यंत जात असल्याने त्याची चौकशी करण्यास त्याच्या वर असलेली संस्था पाहिजे. जे आरोपी तेच न्यायाधीश असे होऊ शकत नाही. त्यामुळे मा. देवेंद्र फडणवीस यांनी केलेली सीबीआय चौकशीची मागणी योग्य आहे. भाजपा ही मागणी लावून धरेल.

    ते म्हणाले की, राज्यपालांनी सांगितल्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक घ्यायची असते. पण महाविकास आघाडीने तीन वेळा अशी निवडणूक टाळली. या सरकारने राज्यपालांचे कुलगुरू नियुक्तीचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षणमंत्र्यांसाठी नवे पद निर्माण करून त्याचा दर्जा कुलगुरुंच्या वरती असावा असाही निर्णय या सरकारने घेतला. ज्या कारणांसाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते त्यापैकी आता कोणतेही बाकी नाही. तथापि, इंदिरा गांधी यांनी किंवा काँग्रेसने ज्या प्रकारे अनेकदा विविध राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली त्या पद्धतीने भाजपाचे नेतृत्व निर्णय घेत नाही.

    उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्यातील उद्योग पळविल्याचा मोघम आरोप करू नये तर निश्चित माहिती दिली तर त्याचे उत्तर देता येईल, असे त्यांनी सांगितले.