भगवान विश्‍वकर्मा जयंतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेने वेधले लक्ष

0

भुसावळ । येथील म्युनिसिपल पार्क भागात असलेल्या पाथरवट समाजाच्या भगवान विश्‍वकर्मा मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदादेखील विश्‍वकर्मा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
रथसप्तमीपासून मंदिरात अखंड नामसप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सात दिवसात मंदिरात काकडा आरती, भजन, कीर्तन तथा ग्रंथवाचन आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच ऑनलाईन वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. यात पुणे, आळंदी, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, फलटण, कल्याण व भुसावळ ही शहरे ऑनलाईन जोडून प्रोजेक्टरच्या सहाय्याने सर्व शहरातील वधू-वरांनी आपला परिचय दिला. तसेच सेवानिवृत्त ज्येष्ठ समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. दुपारी महाप्रसाद व सायंकाळी दहिकाला कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष ईश्‍वर नागपुरे, खजिनदार विशाल काळे, कार्याध्यक्ष वासुदेव पाथरवट, संजय कोळेकर, सुनिल उबाळे, ज्ञानेश्‍वर पाथरवट, विनोद उबाळे यांनी सहकार्य केले.