बोल्ट चौथ्यांदा ठरला लॉरेस जागतिक ‘सर्वोत्तम खेळाडू’

0

मोनाको : वेगाचा बादशाह उसेन बोल्टने विक्रमी चौथ्यांदा लॉरेस जागतिक पुरस्कार सोहळ्यात वर्षातील ‘सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्कारावर आपला शिक्का जमवला आहे. यासह जागतिक विक्रमाची बरोबरी करताना बोल्टने ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लेब्रोन जेम्स या स्टार खेळाडूंना मागे टाकले. त्याचवेळी, जिमनॅस्ट सिमोन बाइल्स हिने महिला गटात बाजी मारली. रिओ आॅलिम्पिक गाजवलेल्या बोल्ट आणि सिमोन या दोन्ही स्टार खेळाडूंचे जेव्हा आगमन झाले, तेव्हा मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचे स्वागत झाले.

बोल्टचा विश्वविक्रम

बोल्टने २००९, २०१० आणि २०१३ साली या पुरस्कारावर नाव कोरले होते. क्रीडा विश्वातील आॅस्कर मानला जाणारा हा पुरस्कार त्याने चौथ्यांदा पटकावला आहे. यासह त्याने रॉजर फेडरर, सेरेना विलियम्स आणि केली स्लेटर या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तित देखील स्थान मिळवले. हा पुरस्कार महान अ‍ॅथलिट मायकल जॉनसन यांच्या हस्ते स्वीकारल्यानंतर बोल्ट म्हणाला की, ‘या शानदार पुरस्कारासाठी धन्यवाद. लॉरेस पुरस्कार माझ्यासाठी मोठ्या पुरस्कारांपैकी एक असून चौथ्यांदा बाजी मारताना रॉजर फेडररसारख्या दिग्गजांची बरोबरी करणे माझ्यासाठी शानदार कामगिरी आहे.’

पुरस्कार मिळवणे सन्मानाची गोष्ट

बिल्सने रिओ येथे गत वर्षी झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिकमध्ये चार सुवर्ण व एक कांस्य अशी पाच पदकांची कमाई केली होती. या कामगिरीमुळेच तिला हा पुरस्कार मिळाला आहे. तिला प्रिन्स अल्बर्ट व ज्येष्ठ जिम्नॅस्ट नादिया कोमेनसी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. सिमोन म्हणाली की, ‘माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. हा पुरस्कार मिळवणे सन्मानाची गोष्ट आहे. हा पुरस्कार माझ्यासह माझ्या गटातील सर्व नामांकित खेळाडूंसाठी आहे. आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्यासाठी प्रत्येक खेळाडूने सारखीच मेहनत घेतली आहे.’

फेल्प्सला सर्वोत्तम पुनरागमन

अमेरिकन जलतरणपटू मायकेल फेल्प्सला सर्वोत्तम पुनरागमन करणाऱ्या खेळाडूचे पारितोषिक देण्यात आले. रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये त्याने पाच सुवर्ण व एक रौप्य अशी पाच पदके जिंकली होती. फॉर्मुला-वनचा विजेता निको रॉसबर्गला सर्वोत्तम प्रतिभावान खेळाडूचे पारितोषिक देण्यात आले. दिव्यांग खेळाडूंसाठी ठेवण्यात आलेला पुरस्कार इटलीची तलवारबाजीची खेळाडू बेत्रिस व्हिओला देण्यात आला.

मी ओवेन्सचाच चाहता -मायकेल जॉन्सन

बोल्टची अ‍ॅथलेटिक्समधील ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धामधील सातत्यपूर्ण कामगिरी पाहता तो महान खेळाडू आहे. त्याने आधुनिक अ‍ॅथलेटिक्सची व्याख्याच बदलली आहे. याबाबत मला किंतू अजिबात नाही, मात्र अ‍ॅथलेटिक्समधील श्रेष्ठ मानला गेलेला जेसी ओवेन्स हा माझा आवडता खेळाडू आहे,’’ असे जॉन्सन यांनी सांगितले. जॉन्सन पुढे म्हणाले, ‘‘वाढत्या स्पर्धात्मक युगात बोल्टची कामगिरी अतुलनीय आहे. मात्र ओवेन्स यांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीत ऑलिम्पिक विक्रम केला ते लक्षात घेता त्यांची कामगिरी माझ्या दृष्टीने सर्वोच्च आहे.