बोर्ड परिक्षेच्या नियोजनासाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक

0

जळगाव । जिल्हात फेबु्रवारी -मार्च महिन्यात होत असलेल्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परिक्षेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला उपशिक्षणाधिकारी विकास पाटील, सिध्दांत नेतकर, किशोर वायकोळे, सरला पाटील, पोलीस अधिकारी खंबाट आदी उपस्थित होते. 28 फेबु्रवारी ते 25 मार्च दरम्यान इयत्ता बारावीची परिक्षा घेण्यात येणार असुन जिल्ह्यातील 51 हजार 739 विद्यार्थी ही परिक्षा देणार आहे. बारावीची परिक्षा जिल्ह्यातील 69 केंद्रावर घेण्यात येणार आहे. तर इयत्ता दहावीच्या परिक्षेसाठी जिल्ह्यातील 64 हजार 487 विद्यार्थी पात्र असुन जिल्ह्यातील 127 केंद्रावर परिक्षा घेतली जाणार आहे. 7 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावीच्या परिक्षेसाठी 7 उपद्रवी केंद्राची तर बारावीसाठी 8 उपद्रवी केंद्राची निवड करण्यात आली आहे.

कॉफीमुक्त अभियान संपुर्ण जिल्ह्यात कॉफीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. कॉफीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्याभरातील विविध शाळांमध्ये जनजागृतीविषयी कार्यक्रम घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वच शाळांनी कॉफीमुक्त अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. कॉफीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी शिक्षणविभागामार्फत करण्यात आली असुन यासाठी विशेष पथकांची नेमणुक करण्यात आली आहे. परिक्षा सुरु असतांना चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील उपद्रवी केंद्र

बोर्ड परिक्षेसाठी जिल्ह्याभरातुन उपद्रवी केंद्राची नेमणुक करण्यात आली असून दहावी परिक्षेसाठी किन्ही, गुळवेल, सोनवद, पाचोरा येथील ग्रामविकास विद्यालय, सामनेर येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाची आदी उपद्रवी केंद्र नेमणुक करण्यात आली आहे. तर बारावी परिक्षेसाठी अ‍ॅग्लो उर्दु हायस्कुल जळगाव, थेपडे माध्यमिक विद्यालय म्हसावद, साने गुरुजी विद्यालय यावल, धनाजी नाना चौधरी विद्यालय फैजपूर, जाकीर हुसेन विद्यालय यावल, रा.का.मिश्रा विद्यालय बहाद्दरपूर या शाळेची नेमणुक करण्यात आली आहे.

पथकाची राहणार करडीनजर

मार्च फेबु्रवारी महिन्यात जिल्ह्याभरात होणार्‍या दहावी बारावी परिक्षेसाठी विशेष पथकाची नेमणुक करण्यात येणार आहे. बोर्ड परिक्षेसाठी जिल्हातील सर्व तालुकानिहाय पथके नेमण्यात येणार आहे. जिल्ह्यात 15 तालुके असुन 15 भरारी पथकाची नेमणुक करण्यात आली आहे. तहसिलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदींचे फिरते पथक बोर्ड परिक्षेवर नजर ठेवुन असणार अशी माहिती शिक्षणाधिकारी यांच्याकडून दिली आहे.