Private Advt

बोरावलच्या तरुणाचा तापी पात्रात मृत्यू

भालशीव तापी काठावरून दुसर्‍या किनार्‍यावर जाताना दुर्घटना : महिनाभरापूर्वीच झाला होता विवाह

यावल : तालुक्यातील बोरावल येथील 36 वर्षीय तरुणाचा तापी नदी पात्रात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 29 रोजी दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. योगेश देवराम शंकोपाळ (36, रा.बोरावल, ता.यावल) असे मयत तरूणाचे नाव आहे.

डंपर चालकाचा तापी पात्रात मृत्यू
यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शंकोपाळ हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. महिनाभरापूर्वीच त्यांचा पुर्नविवाह झाला असून शेळगाव बॅरेज येथे डंपरवर चालक म्हणून काम करतात. दररोज सकाळी 7 वाजेच्या दरम्यान त्यांची दुचाकी तापी नदीच्या किनार्‍यावर लावून तेथून पोहत नदीच्या दुसर्‍या किनार्‍यावर जावून कामाला जातात. नेहमीप्रमाणे गुरूवार, 28 ऑक्टोबर रोजी योगेश दुचाकी भालशिव येथील तापी नदीच्या काठी दुचाकी लावून दुसर्‍या किनार्‍याकडे जात असतांना अचानक बुडाले. यासंदर्भात योगेश यांच्या पत्नीने योगेश यांच्याशी संपर्क केला परंतु संपर्क होवून शकला नाही. त्यानंतर योगेशच्या नातेवाईकांनी भालशीव परीसरात शोध घेतला असता दुचाकी आढळून आली परंतू योगेश दिसून आले नाहीत. शुक्रवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास भालशीव गावाजवळ योगेशचा मृतदेह आढळला. नातेवाईकांनी मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.