बोराडीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ

0

अत्यावश्यक सेवा वगळता बोराडी पाच दिवसासाठी शंभर टक्के बंद
शिरपूर:तालुक्यातील बोराडी येथील एका 24 वर्षीय तरुणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पुढील पाच दिवस अत्यावश्यक सेवा वगळता बोराडी 100 टक्के बंद ठेवण्यात आल्याची स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. दुकाने सुरू ठेवणार्‍यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
बोराडी येथील गुरुवारी उशिरापर्यंत एका 24 वर्षीय तरुणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रात्री 11.30 वाजेच्या सुमारास 24 वर्षीय युवक व त्याच्या संपर्कातील इतर 5 लोकांना शिंगावे क्वारंटाईन सेंटर येथे पाठविण्यात आले. गावात मध्यरात्रीपासूनच प्रशासनाच्या हालचालींना वेग आला. तसेच सकाळीच कंटेन्मेंट झोनची पाहणी करून कुंभार गल्ली परिसर सील करण्यात आला. रात्रीपासून गावातील वस्त्यांमध्ये सॅनीटायझर फवारणी व धुरळणी करण्यात आली. त्या गल्लीतील नागरिकांना मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
गावात तहसीलदार आबा महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसन्न कुलकर्णी, गटविकास अधिकारी रेदा पावरा, सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी नीलिमा देशमुख आदींनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

आजाराचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात होऊ नये, म्हणून गावात 20 पथके तयार करून सर्वेक्षण करण्यात येत आहे. पथकात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, जिल्हा परिषद शिक्षक, आरोग्य कर्मचारी आदींचा समावेश आहे. कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना बाहेर किंवा बाहेरील लोकांना कंटेन्मेंट झोनमधील प्रवेश देऊ नये. कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना बाहेर येता येणार नाही.त्यासाठी ग्रामपंचायतीने त्यांचे एक ते दोन कर्मचारी नेमून नागरिकांना वस्तू आणण्यासाठी मदत करावी. सर्व कामे काटेकोरपणे करावीत. कुठलाही प्रकारचा कामचुकारपणा केल्यास कल्पना केल्यास पहिला गुन्हा ग्रामविकास अधिकार्‍यांवर दाखल करण्यात येईल, अशी तंबी दिली.

तहसीलदार आबा महाजन तसेच उपसरपंच राहुल रंधे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसन्न कुलकर्णी, बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी नीलिमा देशमुख यांनी बोराडी येथील कोविड सेंटरची पाहणी करत कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेदिक महाविद्यालयाचे रुग्णालयात रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
बोराडी येथील पॉझिटिव्ह युवक हा शिरपूर येथील त्याच्या मित्राच्या काकांना धुळे कोविड सेंटरला घेऊन गेलेला होता. त्यात त्याच्या काकांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील बोराडी येथील युवक व त्याचा मित्र असे दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता बोराडी येथील त्या युवकाच्या संपर्कातील लोकांची चौकशी सुरू आहे. त्यात बोराडी येथील कुंभार गल्लीतील हायरिस्क असलेले 10 संशयित रुग्ण, नाशिक येथील 3 व लोरिस्क असलेल्या 30 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्या युवकाचे बोराडी येथे किराणा दुकान असून याबाबत गावात भितीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी बोराडी येथे झालेल्या एका मयत विधी येथे पॉझिटिव्ह रुग्णाच्या पालकाने भेट दिली असल्याने गावातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
*तहसीलदाराच्या भेटीत ‘जनशक्ती’ वृत्ताची दखल*
गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा सहकारी बँक बोराडी अंतर्गत व्यवहार तीन दिवस बँकेचे अंतर्गत व्यवहार व्यतिरिक्त कुठलेही कामे करू नये. तसेच शासकीय यंत्रणेलाही आपले मुख्यालय सोडून कोणीही गैरहजर अथवा बाहेर ये-जा करू नये, असे स्पष्ट निर्देश तहसीलदार आबा महाजन यांनी दिले आहेत. याप्रसंगी ‘जनशक्ती’ने प्रकाशित केलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बातमीचा आढावा घेऊन तहसीलदार आबा महाजन यांनी तेथील व्यवस्थापकांशी यासंबंधी माहिती घेऊन बँक परिसरात ग्राहकांसाठी मंडप, पाणी तसेच सॅनिटायझर आदींची व्यवस्था करावी. जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक तसेच एसबीआय बँक येथे लाऊड स्पीकर लावून लोकांना सोशल डिस्टन्िंसग व नियम याबाबत माहिती देण्यासंबंधी सूचना दिल्या.

Copy