Private Advt

बोरद येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांसाठी लसीकरणास सुरुवात

बोरद। तळोदा तालुक्यातील बोरद येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी, 5 जानेवारीपासून मुख्याधिकारी रघुनाथ गवळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी पं.स. सदस्य विजयसिंह राणा यांच्या उपस्थितीत लसीकरणास सुरुवात करण्यात आली. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी प्रथम मुलींचे लसीकरण करून सुरुवात करण्यात आली.

देशभरात कोरोना व ओमायक्रोन विषाणुमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून गेल्या वर्षभरापासून लसीकरण सुरू आहे. पहिला टप्पा म्हणून 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात केली आहे. तसेच मुले-मुलींची गर्दी पाहून भारावून गेलो असल्याचे मत विजयसिंह राणा यांनी व्यक्त केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण लांडगे, डॉ.पंकज पावरा, ग्रा. पं.सदस्य मंगेश पाटील, रवींद्र वरसाळे, गौतम भिलाव, सामाजिक कार्यकर्ते संजीव पेंटर तसेच आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा वर्कर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.