बोरखेडा हत्याकांड : 18 रोजी जामिनावर कामकाज

बारेला कुटुंबातील चौघा भावंडांची एकाचवेळी वर्षभरापूर्वी हत्या : भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात सुनावणीला सुरूवात

भुसावळ : अत्याचाराचे बिंग बाहेर न येण्यासाठी एकाच कुटुंबातील चौघा भावंडांची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात घडली होती. या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी या हत्याकांड प्रकरणी आरोपीतर्फे जामिनासाठी अर्ज करण्यात आल्यानंतर दोघा बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्या.एस.पी.डोरले यांनी 18 जून ही पुढील सुनावणीची तारीख दिली आहे. सरकारतर्फे या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अत्याचाराचे बिंग न फुटण्यासाठी ‘हत्याकांड’
बोरखेडा शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात रखवालदार मयताब भिलाला व त्यांचे कुटुंब राहत होते. मध्यप्रदेशातील नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी मयताब भिलाला हे पत्नी, मुलगा मुकेशसह 15 ऑक्टोबर रोजी गेले होते. झोपडीवजा घरातील दोन मुले आणि दोन मुली जेवण करून झोपले असता मध्यरात्री तीन आरोपींनी 14 वर्षीय बालिकेवर अत्याचार केला व घटनेचे बिंग बाहेर पडू नये म्हणून चौघा भावंडांची निर्दयतेने हत्या केली होती. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. हत्याकांडात सविता मैताब भिलाला (14), सुमन (6) या भगिनींसह राहुल (11) व अनिल (8) या भावंडांचा मृत्यू झाला होता.

आरोपीच्या जामिनावर 18 रोजी सुनावणी
हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी महेंद्र बारेला (22) यास अटक केल्यानंतर गेल्या वर्षभरापासून तो जळगाव कारागृहातच आहे. शुक्रवारी आरोपीला जामिन मिळण्यासंदर्भात अर्ज करण्यात आल्यानंतर न्या.एस.पी.डोरले यांच्या न्यायासनापुढे त्यावर कामकाज झाले. आरोपीचे वकील अ‍ॅड.एस.आर.पाल यांनी मुंबई व नागपूर न्यायालयाच्या दाखल्यांचा संदर्भ देत संशयीताच्या आईचा अपघात झाला असल्याने संशयीतांला जामीन देण्याची मागणी केली. त्यावर विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांनी परीस्थतीजन्य पुरावे खटल्यात असल्याने जामीन देण्याचा प्रश्नच नाही, संशयीतानेे गुन्हा केल्याची कबूली दिल्याची कबुली दिल्याने जामीन देवू नये, असे सांगितले. अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. डोरले यांनी युक्तीवाद ऐकून 18 रोजी याबाबत निर्णय दिला जाईल, असे सांगितले. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड.विजय खडसे, जळगावचे अ‍ॅड.केतन ढाके उपस्थित होते. खटल्याची सुनावणी ऐकण्यासाठी वकील, पोलिस, पत्रकार यांची गर्दी झाली होती.