बोदवड ग्रामीण रुग्णालयात दोन डॉक्टरांची नियुक्ती

0

बोदवड : कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले असून बोदवड येथे अद्याप आजाराचा शिरकाव झाला नव्हता परंतु एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे बोदवडकरांमध्ये भीती पसरली आहे. बोदवड ग्रामीण रुग्णालयात नियुक्त डॉक्टर यांचा प्रशिक्षण कालावधी संपल्याने ते निघून गेले होते त्यामुळे मात्र उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना उपचार न घेता परत जावे लागत होते. याची दखल घेत खासदार रक्षा खडसे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना डॉक्टर नियुक्त करण्यासाठी निर्देश दिले, त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दोन डॉक्टरांची नियुक्ती बोदवड ग्रामीण रुग्णालयात झाली आहे.

तहसीलदारांना खासदारांनी दिले निर्देश
बोदवड येथे कोरोना रुग्ण सापडल्याने खासदार रक्षा खडसे यांनी रुग्णाच्या कुटुंंबातील किती सदस्य संपर्कात आले ? त्यांच्यात काही लक्षणे दिसताय का ? याबद्दल आरोग्य विभागाकडून जलदगतीने तपास मोहिम सुरू करावी तसेच नगरपंचायतीच्या वतीने रुग्ण राहत असलेला परीसर सँनिटाईझ करावा आणि परीसरात येणारे विविध मार्ग, गल्ल्या सील करण्यात याव्या असे निर्देश तहसीलदार यांना दिले. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी ग्रामविकास अधिकारी, सरपंच, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या सभा घेऊन गाव सॅनिटाईज करणे, गाव सीमा बंद करणे, प्रत्येक आठवड्यातून गाव तीनदा सॅनिटाईज करण्याचे काम करावे. पीपीई किट, मास्क, सॅनिटाईज आणि इतर साधनांचा तुटवडा भासल्यास मला संपर्क करावा, अशा सूचना खासदार रक्षा खडसे यांनी केल्या.

Copy