बोदवडला शिवसेनेच्या पाठिंब्याने होणार भाजपाच नगराध्यक्ष

0

भुसावळ : बोदवड नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी शुक्रवार 23 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे भाजपतर्फे नगराध्यक्षपदासाठी मुमताजबी शेख सईद बागवान तर उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून निवडून आलेले नितीन चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार रक्षा खडसे यांनी जाहिर केले. त्यामुळे आता भाजपाचे संख्याबळ 9 झाले असून शिवसेनेच्या पाठिंब्याने भाजपाचा नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बोदवड नगरपंचायतीमध्ये एकूण 17 सदस्य आहेत. त्यापैकी 9 सदस्यांचे पाठबळ भाजपाकडे असून आमचे उमेदवार निवडून येतील असा विश्‍वास खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केला. तसेच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्यासंदर्भात आमदार एकनाथराव खडसे यांसह बोदवड तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, मधुकर राणे यांच्याशी चर्चा करण्यात आली यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूकीत भाजपाचे अधिकृत 7 नगरसेवक निवडून आले आहेत मात्र सत्ता स्थापनेसाठी 2 नगरसेवकांंची आवश्यकता होती. त्यापैकी 1 अपक्ष नगरसेवक अकबर बेग हे आमचेच होते या आठ नगरसेवकांची नोंदणी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. यानंतर शिवसेनेकडून निवडून आलेले नितीन चव्हाण हेही भाजपाचेच आहेत मात्र मध्यंतरी काही कारणास्तव त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेतली परंतु ते आता आमच्यासोबत असून शिवसेनेशी कोणताही संबंध राहणार नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले असल्याचे सांगितले. याप्रसंगी भाजपा गटनेते कैलास चौधरी, नगरसेविका रेखा गायकवाड, रुपाली राणे, कैलास माळी, मुमताजबी बागवान, सकीनाबी कुरेशी, दिनेश माळी, अकबर बेग मिर्झा, नितीन चव्हाण, अनंत कुळकर्णी, तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, दूध संघाचे संचालक मधुकर राणे, समन्वय समिती अध्यक्ष अनिल पाटील, सुधाकर पाटील, रामदास पाटील, सलमोद्दीन शेख शकील बागवान, अतुल राणे, दिपक माळी आदी उपस्थित होते.

शहराच्या व माझ्या वॉर्डाच्या विकासासाठी आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून भाजपाच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा जाहीर केला असून यापुढे शिवसेनेशी कुठलाही संबंध राहणार नसल्याचे शिवसेनेचे नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार नितीन चव्हाण यांनी सांगितले.