बोदवडला पॅथॉलॉजी चालकांकडून रुग्णांची लूट

0

बोदवड । तालुक्यात रक्त, लघवी, दिर्घ तपासण्यासाठी शहरात तीन ते चार लॅब असून या लॅबचालकांकडे डॉक्टर रुग्णांना रक्त, पांढर्‍यापेशी, मधुमेह तपासण्यासाठी पाठवितात. लॅबचालक रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा फि घेत असून आरोग्य विभागाने संपूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

यातून शहर व परिसरातील रुग्णांची लूट होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जाते. बोदवड ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशिन बंद आहे. लॅबचालकांकडे प्रशिक्षित कर्मचारी आहे किंवा नाही, याची शहानिशा आरोग्य विभागाने कधीही केली नसल्याचे दिसून येते.

बीडीओंकडे करण्यात आली होती तक्रार
शहर व परिसरातील पॅथॉलॉजी लॅब चालकांच्या दर्शनीभागी कुठेही रक्त, लघवी तसेच इतरही वैद्यकिय चाचण्यांचे दरपत्रक लावलेले दिसून येत नाही. त्यामुळे आलेल्या रुग्णांकडून लॅब चालकांकडून मनाला वाटेल तेवढे पैसे वसूल केले जात असल्याचे बोलले जाते आहे. गेल्या दिड वर्षापूर्वी तालुक्यातील जामठी येथील बोगस डॉक्टरची तक्रार सुध्दा तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी एन.आर. पाटील यांच्याकडे करण्यात आलेली होेती. यावरुनच तालुक्यात वैद्यकिय चाचण्यांबद्दल किती अनागोंदी बोकाळली आहे. हे दिसून येते. आरोग्य विभाग हा गैरप्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.

दखल घेण्याची मागणी
शहर व तालुक्यात टायफाईड व पेशी कमी झाल्याचे लॅबचालकांचे रिपोर्टचे प्रमाण जास्त आहे. रुग्णाच्या रक्तपेशी कशा कमी होतात. टायफाईडचे प्रमाण जास्त का आहे, याची आरोग्य विभागाने कधीही दखल घेेतली नाही. आरोग्य विभाग सुस्त, खाजगी लॅबचालक मस्त असे चित्र दिसून येत आहे. त्या गैरप्रकाराची आरोग्य विभागाकडून कधीही चौकशी केल्याचे दिसून येत नाही. आरोग्य विभागाने दखल घ्यावी, अशी जनतेची मागणी आहे.