बोदवडमध्ये दिड लाखांचा अवैध मद्य साठा जप्त : दोघे जाळ्यात

भुसावळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बोदवड शहरातून दिड लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केला असून दोन संशयीतांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जळगाव भरारी पथकाचे निरीक्षक चंद्रकांत पाटील व भुसावळ कार्यालयाचे विभागीय निरीक्षक सुजीत कपाटे व त्यांच्या सहकार्‍यांनी चोपडा मार्गावर मिळालेल्या माहितीच्या आधारे रस्त्याने जात असलेली दुचाकी अडवून तिची झडती घेतल्यानंतर एका पिशवीत मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्यांचे बुच आढळले. हे बुच बोदवड तालुक्यातील कुर्‍हा हर्दो येथे नेत असल्याची माहिती दिल्याने संशयीत विजय एकनाथ भोई या संशयीतास ताब्यात घेण्यात आले तर बोदवड येथील महाराष्ट्र ढाब्याच्या परीसरात असलेल्या एका शेतातून पथकाला बॉम्बे व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 480 सीलबंद बाटल्या तसेच देशी विदेशी मद्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी ढाबा मालक ज्ञानेश्वर तुकाराम मोहोर यास अटक करण्यात आली तर एक लाख 54 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक वर्मा, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक जळगावचे निरीक्षक सी.एच.पाटील, दुय्यम निरीक्षक आनंद पाटील, भुसावळ विभागाचे निरीक्षक सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, जवान कुणाल सोनवणे, नरेंद्र पाटील, अजय गावंडे विठ्ठल हटकर, वाहन चालक मुकेश पाटील, सागर देशमुख व रघुनाथ सोनवणे आदींनी केली.