बोदवडमध्ये कोरोनाचा शिरकाव

0

बोदवड : शहरातील एका भागातील 73 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत सेफ झोनमध्ये असलेल्या बोदवडमध्ये कोरोना रुग्ण नसल्याने नागरीकांना दिलासा मिळाला असतानाच कोरोनाचा रुग्ण आढळल्याने नागरीकांमध्ये चिंता पसरली आहे.

रेणुका माता मंदिराचा परीसर सील
जिल्ह्यात कोरोनाने एक हजाराचा आकडा पार केलेला आहे. भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर, मलकापूर अश्या आजूबाजूच्या चारही तालूक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी कोरोनामुक्त तालूका म्हणून बोदवडची ओळख कायम होती मात्र शहरातील एक महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरातील रेणुका माता मंदिर परीसरात राहणार्‍या 73 वर्षीय महिलेवर जळगाव येथे गेल्या पाच दिवसांपासून रक्तदाबाच्या त्रासाकामी उपचार सुरू होते तर कोरोना संदर्भात लक्षणे दिसत असल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर रेणुका माता मंदिराचा परीसर सील करण्यात आला आहे. दरम्यान, बाधीत रुग्णांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलेल्यांचा आता आरोग्य विभागाकडून शोध सुरू करण्यात आला आहे. नगरपंचायतीने रेणुका माता मंदिर परीसराचे निर्जंतुकीकरण केले आहे.

बोदवडमध्ये कंटेन्मेंट झोन जाहीर
रेणूका माता मंदिराजवळील भाग (प्रभाग क्रमांक 6) कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला असून प्रभाग क्रमांक 6 प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमिवरअत्यावश्यक सेवा देणार्‍या आस्थापनांशी समन्वय म्हणून नगरपंचायतीकडून कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिकारी म्हणून नगरपंचायतीकडून सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक राजूसिंग चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Copy